Coronavirus Effect : 5 वी, 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन देशात विविध प्रवेश परीक्षांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द केल्या जात आहेत. असे असताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 23 मे 2021 रोजी घेतल्या जाणा-या इयत्ता 5 वी अन् 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दरम्यान कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यार्थी हिताच्या दृष्टीने 23 मे रोजी राज्यातील 37 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी इयत्ता 5 वी आणि इयत्ता 8 वीची शिष्यवृत्तीची परीक्षा तूर्तास पुढे ढकलली आहे. परीक्षेची पुढील तारीख योग्यवेळी कळविण्यात येईल, असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे दर वर्षी इयत्ता 5 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य परिस्थितीत जानेवारी- फेब्रुवारी दरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेचे केले जाते. यंदाही परीक्षा 25 एप्रिल रोजी होणार होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परीक्षा 23 मे रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वाढत्या कोरोनामुळे परीक्षा रद्द केली आहे.