माजी जिल्हा परिषद अध्यक्षासह नवनिर्वाचित सरपंच विरोधात गुन्हा दाखल; शिरूर तालुक्यातील घटना

शिक्रापुर : शिरुर तालुक्याच्या वडगाव रासाई येथे सरपंच उपसरपंच पदाच्या निवडीनंतर डिजे लावून, मिरवणूक काढत, गुलाल उधळून करत जिल्हाधिकारी, पुणे यांच्या जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीपुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष , नवनिर्वाचित सरपंच यांच्यासह आठ जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिस कॉन्स्टेबल योगेश गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, वडगाव रासाईचे नवनिर्वाचित सरपंच सचिन शेलार, संपत ऊर्फ नाना संभाजी फराटे यांच्या मालकीच्या जेसीबीवरील चालक, सुरेश गुलाब शेलार यांच्या बेंजोच्या गाडीचा चालक, भाजप सहकार आघाडीचे तालुकाध्यक्ष काका खळदकर, शिवसेनेचे विभाग संघटक वीरेंद्र शेलार, मोहन चव्हाण, भाऊ यादव, पोपट पंढरीनाथ शेलार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वडगाव रासाई येथे सरपंच उपसरपंच निवडीनंतर विना परवाना मिरवणूक काढणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे आणि साथरोग नियमावलीचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीप कंद, नवनिर्वाचित सरपंच सचिन शेलार यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडगाव रासाई ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचपदाची बुधवारी निवडणूक झाली. निवडीनंतर नवनिर्वाचीत सरपंच सचिन शेलार हे ग्रामपंचायतीसमोरील मोकळ्या जागेत आले असता, प्रदीप कंद यांच्यासह आठ ते दहाजण हे जेसीबीच्या बकेटमध्ये बसले व तेथून त्यांनी गुलालाची उधळण केली. या वेळी पन्नास ते साठ जणांनी विनापरवानगी मिरवणूक काढून घोषणाबाजी करीत जल्लोष करण्यात आला.

वडगाव रासई गावातील निवडणुकीनंतर गावात जाऊन सरपंचाच्या मिरवणुकीत बेकायदा जमाव जमवून सहभागी होणे, जल्लोष करणे या हे माजी अध्यक्षांना महागात पडले आहे. जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियमांचा भंग केल्याप्रकरणी नूतन सरपंचांसह कंद यांच्यावर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.