ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला दिल्ली पोलिसांकडून अटक, सागर राणा हत्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्युनिअर सुवर्णपदक विजेता पैलवान सागर राणा याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता सुशील कुमार याची अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी सत्र न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी शनिवारी (दि. 22) सुशील कुमारला पंजाबमधून अटक केली आहे. तर त्याचा खाजगी सचिव अजय कुमारलाही बेड्या ठोकल्या आहेत.

काही दिवसापूर्वी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंग परिसरात मल्लांच्या दोन गटात भांडण झाले होते. या भांडणाचे रूपांतर मारहाणीत होताच फायरिंग झाले. त्यात 5 मल्ल जखमी झाले होते. यात सागर (23), सोनू (37) ),अमित कुमार (27) अन्य दोघांचा समावेश आहे. यात सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सागर आणि त्याचे मित्र ज्या फ्लॅटवर राहायचे तो फ्लॅट खाली करण्यासाठी सुशील दबाव आणत होता. पोलिसांनी घटनास्थळावरून 5 वाहनांसह बंदूक आणि 3 जिवंत काडतुसे ताब्यात घेतली होती. या प्रकरणात सुशील कुमार याचे नाव समोर येताच तो फरार झाला होता. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली पोलीस सुशीलचा शोध घेत होते. तसेच सुशीलची माहिती देणा-यांना पोलीसांनी 1 लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. तर त्याचा खासगी सचिव अजय हा देखील फरार असून, त्याला शोधून देणा-यास 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. सुशील आणि अजयसह अन्य आरोपींविरुद्ध अजामीनपात्र नोटीस बजाविण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जगदीश कुमार यांच्या समक्ष झालेल्या सुनावणीच्या वेळी दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केला होता. न्यायालयाने विविध बाबी तपासल्यानंतर सुशीलसह सर्व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता.