Pandharpur : अरे देवा ! विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर आलं पुराचं पाणी, भाविकांना करावा लागतोय होडीनं प्रवास

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून उजनी, वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने भीमा (चंद्रभागा) नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर आले असून, या परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पडताना होडीने प्रवास करावा लागत आहे.

भीमा (चंद्रभागा) नदीत उजनी आणि वीर धरणातून सकाळी सात वाजता २ लाख ८७ हजार क्युसेक इतका विसर्ग होता. अकरा वाजता वाढून तो २ लाख ९१ हजार इतका झाला आहे. तसेच स्थानिक ओढे, नाल्यांचे ४० हजार पाणी मिसळत असल्याने सुमारे साडे तीन लाखांच्या आसपास भीमा (चंद्रभागा) नदीत पाणी वाहत आहे. या पाण्यामुळे शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, लखुमाई मंदिर, गोविंदपुरा, आंबेडकर नगर, दत्तनगर, तांबडा मारुती, भजनदास चौक या भागात पुराचे पाणी आले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील ८ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

पंढरपूर शहराला जोडणारे हे मार्ग झाले बंद

पंढरपूर शहराला जोडणारे पंढरपूर-मंगळवेढा, पंढरपूर-मोहोळ-सोलापूर, पंढरपूर-भंडीशेगाव-पुणे, हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. तसेच भीमा (चंद्रभागा) नदीवरील अहिल्या पूल व नवीन पुलावर पाणी आल्याने ते मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षितेसाठी एन.डी.आर.एफ.ची टिम बोलवण्यात आली असून त्यांच्यामार्फत मदत व बचाव कार्य सुरु आहे. त्याचसोबत प्रांताधिकारी सचिन ढोले व महसूल विभागाची टिम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व त्यांची टिम तसेच मुख्याधिकारी अभिजित मानोरकर व त्यांची टिम मदत व बचाव कार्य करीत आहे.