Pune : ‘पद्मश्री’ने सन्मानित झालेले माजी IAS अधिकारी अच्युत गोखले यांचे पुण्यात कोरोनामुळे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नागालँडचे तत्कालीन मुख्य सचिव आणि केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत माधव गोखले (वय ७५) यांचे कोरोना संक्रमणामुळे निधन झाले. व्हिलेज डेव्हलपमेंट बोर्ड व जवाहर रोजगार योजना क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल १९९० मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले होते. तर १९६५ मध्ये मुंबई विद्यापीठातून पदार्थविज्ञान विषयामध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ नौदलामध्ये काम केले. गोखले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा त्यांचा परिवार आहे.

अच्युत गोखले यांचा जन्म ३ जानेवारी १९४६ रोजी झाला. नौदलामध्ये काम केल्यानंतर ते नागालँड केडरमधून भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये रूजू झाले. विविध पदांवर काम करताना गोखले यांनी नागालँड येथे ग्रामीण विकासामध्ये त्यांनी भरीव योगदान दिले. नागालँड एम्पॉवरमेंट ऑफ पिपल थ्रू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (NEPED) योजनेच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यामध्ये अच्युत गोखले यांना यश आले. १९८७ ते १९९२ दरम्यान केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामध्ये सहसचिव म्हणून काम करताना त्यांनी जवाहर रोजगार योजना यशस्वीपणे राबविली होती.

दरम्यान, गोखले हे १९९२ मध्ये ते पुन्हा नागालँडमध्ये परतले. नागालँडमध्ये असताना त्यांनी वनस्पतीशास्त्राचा अभ्यास केला होता. तेथील वनस्पतींची छायाचित्रे त्यांनी टिपली होती. या छायाचित्रांचा समावेश असलेल्या पुस्तकांमध्ये पुस्तकांचा जगभरामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून वापर केला जातो. तसेच कृषी आयुक्त आणि राज्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी कार्य केले. केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे सचिव या पदावरून ते सेवानिवृत्त झाले.