काय चाललंय काय …??? आता बँकांच्या मोफत सेवाही बंद होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे निरव मोदी, विजया माल्या, मेहुल चोक्सी सारखे ‘ठग्ज ऑफ बॅंक्स’ बँकांना चुना लावून परदेशात पसार झाले आहेत. तर दुसरीकडे बँका सर्वसामान्य जनतेला नवनवे नियम लावून अधिकच कचाट्यात पाडताना दिसत आहे. सध्या बँका थकीत कर्जाच्या ओझ्याखाली दाबल्या गेल्या आहेत, अशा बँकांनी केंद्र सरकार समोर नवा पेच निर्माण केला आहे. जर केंद्र सरकारने बँकांना देण्यात आलेली ४०,००० कोटी रुपयांची सेवाकराची नोटीस मागे घेतली नाही, तर ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्वप्रकारच्या मोफत सेवांवर गंडांतर आणण्याचा इशारा बँकांनी दिला आहे. तसे झाल्यास आधीच महागाईमध्ये होरपळणाऱ्या सामान्यांसाठी बँकांच्या सेवा महाग होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार मोफत बँक सेवांवर देखील लावणार कर ?
एप्रिल महिन्यात जीएसटी संचलनालयाने बँकांकडून देण्यात येणाऱ्या मोफत सेवांवरील सेवाकरापोटी ४०,००० कोटी रुपये भरण्याची नोटीस दिली होती. या प्रकरणी केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि बँकांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून, त्यामध्ये अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. बँकांच्या मते ग्राहकांना देण्यात येणाऱ्या मोफत सेवांवर केंद्र सरकारने कराची आकारणी केल्यास ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या मोफत सेवा दिल्या जाणार नाहीत. एका खासगी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार आता हे प्रकरण पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या पुढाकाराने बँका आणि अर्थ मंत्रालयाची बैठक आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे.
कोणत्या बाबींसाठी मोजावे लागणार पैसे ?
केंद्र सरकारने बँकांना सेवाकर चुकविण्यास भाग पाडले तर, ग्राहकांना खालील गोष्टींकरिता पैसे मोजावे लागतील
— चेकबुक मागवणे
— एटीएमधून रक्कम काढणे
— बँकेत रक्कम जमा करण्यासाठी
— जनधन खात्यांसाठीही बँकेला शुल्क देण्याची वेळ येणार
सरकार मध्यममार्ग काढण्याची शक्यता
काही बँकांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी केंद्र सरकार आणि बँकांकडून मध्यममार्ग काढला जाण्याची शक्यता आहे. जेणेकरून सध्या मोफत असणाऱ्या सेवांसाठी ग्राहकांना शुल्क देण्याची वेळ येईल. ज्या खात्यांना किमान शिल्लक रकमेची मर्यादा घालण्यात आली आहे, त्या खात्यांना बँकेतर्फे सर्व सुविधा मोफत देण्यात येत असतील तर, सेवांवर जीएसटी लागू होणार नसल्याचे केंद्र सरकारने जूनमध्येच स्पष्ट केले होते. मात्र, त्या वेळी केंद्र सरकारने संबंधित बँकांना सेवाकराविषयी कोणतीही कल्पना दिली नव्हती, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शिल्लक मर्यादेवरून बँकांवर टीका 
काही बँका काही ठरावीक खातेदारांकडून खात्यात किमान शिलकीची मर्यादा न राखल्याबद्दल शुल्क आकारणी करीत आहेत. बँकांच्या या कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. त्यामुळे अशा परिस्थितीत बँकांकडून मोफत देण्यात येणाऱ्या सेवा बंद झाल्यास ग्राहकांसाठी बँकिंग सेवांचा अवलंब करणे महागडे ठरण्याची शक्यता आहे.
बँकांवर कर चुकविण्यासाठी दबाव 

चालू आर्थिक वर्षात एप्रिलमध्ये महसूल विभागाने संबंधित बँकांवर सेवा कर चुकता करण्यासाठी दबाव टाकला होता. वेळेत सेवा कर सरकारी तिजोरीत न जमा केल्यास दंड आणि व्याज आकारण्याचीही भीती त्यांना दाखविण्यात आली. १२ टक्के सेवा कराची रक्कम न चुकवल्यास एकूण रकमेवर १८ टक्के कर आणि १०० टक्के दंड आकारण्यात येणार असल्याचेही महसूल विभागाने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर संबंधित बँकांनी ‘इंडियन बँक्स असोसिएशन’कडे (आयबीए) या संदर्भात दाद मागितली. सेवा कराच्या माध्यमातून केंद्र सरकारतर्फे करण्यात येणारी मागणी अन्यायी असल्याची बँकांची भावना आहे. एका खासगी वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे केंद्र सरकारने मे महिन्यात बँकांच्या दबावाला बळी पडून सेवाकराची नोटीसही मागे घेतल्याचे म्हटले आहे. मात्र, काही वृत्तसंस्थांच्या मते ही नोटीस अजून मागे घेण्यात आलेली नाही.