‘तू जर मला विसरण्याचा प्रयत्न केलास ना तर…’, चिठ्ठी लिहून ‘प्रपोज डे’च्या दिवशी 9 वी च्या विद्यार्थिनीची आत्महत्या

जामनेर : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या जगभर वॅलेंटाईन वीक सुरू आहे. नुकताच अनेकांनी प्रपोज डे साजरा केला. परंतु याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तिनं एक सुसाईड नोटही लिहली आहे. यात एका मुलाचं नाव असून पोलीस या संबंधित मुलाचा शोध घेत आहेत.

आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव सीमा संतोष वानखेडे आहे. ती 15 वर्षांची होती. सोमवारी दुपारी सीमानं एका मुलाच्या नावानं चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. यामुळं परिसरात खळबळ उडाली आहे. सीमा मालदाभाडी येथील न्यु इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये शिक्षण घेत होती. तिचे वडिल कामानिमित्त कोल्हापूरला वास्तव्यास असतात. तर आई गावीच शेतमजुरीचं काम करते. तिला एक लहान भाऊ असून दोघंही एकाच शाळेत जात होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, सीमाची आजी बिंदाबाई उखा खरात सीमा घरी आली की नाही हे पाहण्यासाठी आली होती. तिला घराचा दरवाजा फक्त लोटलेला दिसला. तिनं दार उघडून आत पाहिलं तर घराच्या छताला सीमाचा मृतदेह लटकलेला दिसला. यानंतर आजीला एकच धक्का बसला. तिनं आरडाओरडा केल्यानंतर गावकरी मदतीला धावले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन जामनेर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.

सीमानं एक चिठ्ठी लिहिली होती. यात लिहिलं आहे की, आय लव्ह यु ऋषीकेश, तुला माहिती नसेल मी तुझ्यावर किती प्रेम करते. ए ऋषी तू जर मला विसरण्याचा प्रयत्न केलास ना तर…

तपासात पोलिसांच्या हाती ही चिठ्ठी लागली आहे. यात उल्लेख केलेला ऋषीकेश नेमका कोण आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत. सीमाचे मामा रुपेश वसंत खरात यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी अक्षय चोपडे आणि त्याचा मित्र ऋषीकेश विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघंही नवी दाभाडी येथील रहिवाशी आहेत. अक्षय चोपडे नावाचा हा युवक सोमवारी सीमाच्या घराबाहेर संशयास्पदरित्या फिरताना आढळल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.