‘Google तुमचे लोकेशन नाही तर ह्रदयाचे ठोकेही तपासणार’, कॅमेर्‍यात जबरदस्त ‘फीचर’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही Google ला एखादा प्रश्न विचारला आणि त्याचे तुम्हाला उत्तर मिळाले नाही असं कधी झालं आहे. Google ला सगळे माहिती असतं आणि खरेही आहे. महिन्याच्या शेवटी तुम्ही कुठे कुठे फिरलात, कोणत्या ठिकाणी किती वेळ घालवला आदीचा एक रिपोर्ट येतो. म्हणजेच गुगलला तुम्ही आत्ता या क्षणाला कुठे आहात ते माहिती असते. आता गुगल तुमच्या हृदयाचे ठोकेदेखील मोजणार आहे. गुगलने पिक्सल स्मार्टफोनमधील गुगल फिट ॲपमध्ये नवीन हार्ट रेट आणि रेस्टिरेटरी मॉनिटर देण्याची घोषणा केली आहे. हे फिचर या महिन्याच्या अखेरीस जारी केले जाण्याची शक्यता असून कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

गुगल पिक्सल डिव्हाईससाठी पुढील काही दिवसांत हे फिचर काम करणार आहे. कॅमेराच्या मदतीने युजरचा ‘हार्ट रेट मॉनिटर’ केला जाणार आहे. यासाठी फिंगरटिप्सद्वारे रक्तातील रंग बदलाव ट्रॅक केले जाणार आहेत. दुसरीकडे रेस्पिरेटरी मॉनिटर युजरच्या छातीतील धडधड ट्रॅक करणार आहे. कंपनीच्या एका हेल्थ प्रॉडक्ट मॅनेजरने सांगितले की, डॉक्टर देखील एखाद्या रुग्णाचा श्वासोच्छवासादरम्यान रेस्पिरेटरी रेट छाती वर येणे आणि खाली जाणे या क्रियेद्वारे तपासतात. गुगलचा रेस्परेटरी मॉनिटरदेखील याच प्रकारे काम करणार आहे. कंपनीने सांगितले की, हे फिचर अशासाठी दिले जाणार आहे कारण याद्वारे य़ुजरला त्याच्या आरोग्याची माहिती मिळत जाईल. मात्र, हे मॉनिटर युजरच्या मेडिकल कंडिशनचा अंदाजा लावू शकणार नाहीत. यामुळे याचा वापर वैद्यकीय वापरासाठी होण्याची शक्यता कंपनीने नाकारली आहे.

सॅमसंगमधील फिचर…
गुगलच्या पिक्सल फोनमध्ये येत असलेला हार्ट रेट मॉनिटर जवळपास सॅमसंगच्या गॅलेक्सी S10 सारख्या काही डिव्हाईसमध्ये मिळत असलेल्या फिचरसारखा काम करणार आहे. सॅमसंगने हे फिचर गॅलेक्सी S10e, Galaxy S20 सिरीज आणि यानंतर लाँच झालेल्या स्मार्टफोनमधून काढून टाकले आहे.

Google Maps आता मराठीतून सांगणार रस्ता… येथून उजवीकडे वळा…!
गुगल मॅप्समध्ये १० भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे. स्थानिक भाषेत गुगल मॅप्सची सेवा सुरू झाल्यामुळे इंग्रजी न समजणाऱ्या युझर्सनाही एखादा पत्ता शोधताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. भारतात रस्ता शोधण्यासाठी किंवा एखाद्या वेळी रस्ता चुकल्यावर सर्रासपणे गुगल मॅपचा वापर केला जातो. गुगल मॅप वापरणाऱ्या युझर्सची संख्या भारतात कोट्यवधीच्या घरात आहे. मात्र, इंग्रजीचे ज्ञान नसणाऱ्यांसाठी गुगल मॅप्सने मोठी सोय केली आहे. कारण, युझर्सच्या आवश्यकतांनुसार गुगल मॅप्समध्ये बदल करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. गुगल मॅप्सची सेवा आता मराठी भाषेतही उपलब्ध होणार आहे. यासंदर्भातील एक घोषणा अलीकडेच करण्यात आली.