OTT प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशीपची टांगती तलवार, प्रकाश जावडेकरांनी दिले ‘हे’ संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून Amazon Prime Video वर प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘तांडव’ वेब सीरीजमधील काही दृष्यामुळे विशिष्ट लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर देशातील विविध ठिकाणी तांडव विरोधात संबंधित लोकांनी गुन्हे दाखल केले आहेत. या वेबसीरीजमधील आक्षेपार्ह दृष्य हटवल्यानंतर हा वाद निवळला आहे. मात्र, आता ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग संदर्भात नियमावली बनवली जाणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. ओटीटी मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, मंत्रालय लवकरच ओव्हर द टॉप (OTT) प्लॅटफॉर्मसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. कारण सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या वेब सीरीजसंदर्बात बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. अलीकडेच तांडव, मिर्झापूर आणि अ सुटेबल बॉय या वेब सीरीजबद्दल इतका वाद वाढला होता की, त्यांच्यावर अनेक ठिकाणी खटले दाखल करण्यात आले.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या काही वेब सीरीजविरुद्ध बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केलेले चित्रपट आणि मालिका, डिजिटल वर्तमानपत्रे, केबल टेलिव्हिजन नेटवर्क ॲक्ट किंवा सेन्सॉर बोर्डाच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत. त्यामुळे लवकरच या सर्वांचं नियमन करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना देण्यात येणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.