Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांची ठाकरे गटावर टीका, ”खोके म्हणणाऱ्यांच्या घरीच खोके सापडतात, त्यात आमचा…”

जळगाव : सध्या सगळीकडेच धाडी पडत आहेत. नोटा सापडत आहेत. खोके म्हणणाऱ्यांच्या घरीच खोके सापडतात. त्यात आमचा काय दोष आहे? कारवाई करणे हे यंत्रणेचे काम असते. जिथे चुकीचे काही होत असेल त्याची माहिती अधिकाऱ्यांना असते. त्यानुसार ते छापा टाकून कारवाई करतात, असे म्हणत शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) शिवसेना ठाकरे गटावर (Shivsena UBT Group) टीका केली आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Shiv Sena leader Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. तसेच ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड पडली आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. या टीकेला पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना गुलाबराव पाटील म्हणाले, आरोप करणे हे एका वर्तमानपत्रात अग्रलेख लिहिण्याइतके सोपे नसते. घोटाळ्याचा आरोप करताना कागदपत्रे द्यावी लागतात. त्यामुळे संजय राऊतांनी आधी कागदपत्रे द्यावीत.

काय म्हणाले संजय राऊत
संजय राऊत यांनी आज म्हटले की, शिंदे गटात आला नाहीत तर एजन्सींच्या मार्फत कारवाई होईल, अशा धमक्या ठाकरे गटातील नेत्यांना दिल्या जात आहेत. सूरज चव्हाण, रविंद्र वायकर, राजन साळवी यांना धमक्या दिल्या जात आहेत. आमच्या जनता न्यायालयामुळेच दुसऱ्या दिवशी सूरज चव्हाण यांना अटक झाली. सूरज चव्हाण यांची अटक ही राजकीय अटक आहे. शिंदे गटातील नेत्यांनी आठ हजार कोटींचा घोटाळा केला आहे.