हप्ता घेऊनही पोलिसांनी केली मारहाण, गुटखा विक्रेत्याची थेट पोलीस आयुक्ताकडे तक्रार, कारवाई न केल्यास आत्महत्येचा इशारा

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाईन –   गुटखा बंदी असूनही विकत असल्याने पोलिस आपल्याकडून दरमहा 10 हजाराचा मासिक हप्ता घेत होते. मात्र दुकानात 2 गोणी गुटखा सापडला म्हणून मारहाण करत गुन्हा न दाखल करण्यासाठी 3 लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार मीरा भाईंदरमधील येथील गुटखा विक्रेत्याने पोलीस आयुक्तांकडे केली. तसेच समाज माध्यमावर देखील त्याने स्वतःचा व्हिडीओ टाकून कारवाई करा असे म्हटले आहे .कारवाई न केल्यास आत्महत्येचा इशारा त्याने दिला आहे. दरम्यान आयुक्तांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुनिब गुप्ता असे या विक्रेत्याचे तक्रारदार विक्रेत्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, भाईंदर पूर्वेच्या नवघर रोड येथे मुनिब गुप्ता ह्याचे जनरल स्टोअरचे दुकान आहे. त्याने 25 डिसेंबर रोजी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने, तो राज्यात बंदी असूनही दुकानात गुटखा विकतो. गुटखा विक्री आपण करत असल्याची माहिती नवघर पोलिसांना असून दरमहा 10 हजार रुपयांचा हप्ता त्यासाठी दिला जात होता.

गुरुवारी (दि. 24) नवघर पोलिस ठाण्यातील कर्मचारी वाघ, गिरगावकर यांनी आपल्या दुकानात येऊन झडती घेतली असता त्यांना दुकानात 2 गोणी भरून गुटखा सापडला. त्यानंतर पोलिसांनी आणखी तपास करीत आपल्याला घरी नेले. तेथे पत्नी व मुलांसमोर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. 328 कलमानुसार गुन्हा दाखल केल्यास तुरुंगात राहावे लागेल आणि सुटण्यास खूप खर्च करावा लागेल. अडीच ते तीन लाख रुपये दे मग गुन्हा दाखल करणार नाही असे धमकावत पैशांची मागणी केली.

सदर रक्कम शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत दे असे पोलिसांनी बजावले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी गुप्ता ह्याने मीरा-भाईंदर व वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडे लेखी तक्रार करून मारहाण व लाच मागणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले यांना चौकशी करून 5-6 दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तर 2 गोणी गुटखा सापडल्यानंतर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने अडचण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.