जाणून घ्या दररोज अक्रोड खाण्याचे ‘हे’ 12 आरोग्यदायी फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुक्या मेव्यामध्ये वापरला जाणारा अक्रोड खूप पौष्टीक आणि औषधी गुणधर्म असणारं आहे. याचे केस, आणि मेंदूसाठी आपल्याला खूप फायदे होतात. आज याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

अक्रोडाचे औषधी गुणधर्म – अक्रोडाचा गर चवीला तुरट, मधुर, विपाक कटू आणि उष्ण वीर्यात्मक असून पित्तकार आणि वातघ्न आहे. अक्रोडमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, अ आणि ब जीवनसत्व, प्रथिनं, उष्मांक, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थ असतात. या सर्व घटकांमुळं मेंदूची दुर्बलता कमी करून त्याला बलवान करण्याचं महत्त्वाचं काम अक्रोड करतं. इतर सुक्या मेव्यासोबत जर अक्रोडाचं सेवन केलं तर जास्त फायदेशीर ठरतं.

अक्रोड खाण्याचे उपयोग पुढील प्रमाणे –

1) शरीर कृश असणाऱ्या आणि अशक्तपणा जाणवणाऱ्या लोकांनी सकाळी उठल्याबरोबर 2-3 अक्रोड आणि इतर सुकामेवा खावा.

2) शुक्रजंतू कमी असल्यानं वंध्यत्व निर्माण झालेल्या पुरुषांनी अक्रोडचं नियमित सेवन करावं.

3) अक्रोड हे वातघ्न असल्यानं संधीवात या आजारावर उपयुक्त आहे. संधीवात असणाऱ्यांनी 7-8 अक्रोडचं सेवन करावं.

4) अक्रोडाचं तेल नियमित सेवन केलं तर आतड्यांधील कृमी नाश पावतात आणि शौचावाटे बाहेर पडतात.

5) अक्रोड हे सारक गुणधर्माचं असल्यानं मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी अक्रोड नियमित खावं. यात असणाऱ्या तेलामुळं आणि तंतुमय पदार्थांमुळं शौचाला साफ होते.

6) अक्रोडाची पानं कृमीनाशक आहेत.

7) अक्रोड वनस्पतीची साल आणि पानं गंडमाळा, पुरळ, उपदंश आणि त्वचारोग आदींवर गुणकारी आहे.

8) चेहऱ्यावर काळे वांग असणाऱ्यांनी अक्रोड बारीक उगाळून त्याचा लेप चोळून लावावा. यामुळं काळे वांग कमी होण्यास सुरुवात होते.

9) अक्रोड बीज तेल खाद्यतेल म्हणून उपयोगात येते तर रंग साबणातही सौंदर्यवर्धक म्हणून उपयोगी ठरतं.

10) सहसा जेवणानंतर अक्रोड खावं. यामुळं खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यास मदत होते.

11) अकाली केस पांढरे होणं, केस गळणं, या तक्रारींवर अक्रोड सिद्ध तेल वापरलं तर केस काळेभोर आणि लांब होतात. हे तेल बनवताना अक्रोड बी सोबत त्याच्या वृक्षाच्या सालीचाही वापर करावा.

12) विसराळूपणा जास्त जाणवत असेल तर रोज सकाळी 4-5 अक्रोड खावेत. त्यासोबत प्राणायम व ध्यानधारणा नियमितपणे करावी. यामुळं विस्मरण कमी होऊन बुद्धीवर्धन होतं.

‘ही’ सावधानता बाळगा

अक्रोड खरेदी करताना शक्यतो त्याच्या कवचासह खरेदी करावा. जेव्हा तुम्हाला अक्रोड खायचं असेल तेव्हाच ते फोडावं. कारण फोडलेला अक्रोड जेवढे दिवस बाहेर राहिल तेवढे त्याचे गुणधर्म, स्वाद आणि चव कमी होत जाईल. यात तेल असल्यामुळं लवकर कीड लागून ते खराब होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला अक्रोड फोडून गर ठेवायचाच असेल तर घट्ट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.