Coronavirus Guidelines : विद्यार्थी आणि शिक्षकांनी ‘कोरोना’पासून बचावासाठी ‘या’ 10 गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत सरकारने अलीकडेच 9 ते 12 वीच्या वर्गांसाठी ऐच्छिक तत्त्वावर शाळा अंशतः सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, विद्यार्थी त्यांच्या आई-वडील अथवा पालकांच्या लेखी परवानगीने शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्या शाळांमध्ये जाऊ शकतात.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड -19 चा प्रसार होण्याचा धोका कमी करण्यासाठी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना ध्यानात घेऊन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दरम्यान हे लक्षात ठेवा की विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार शाळेत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या पालकांकडून लेखी परवानगी असणे आवश्यक आहे. शाळेत जाणार्‍या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी स्वत:ला आणि इतरांना कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी या 10 गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे.

1. शाळेत प्रवेश एक संघटित पद्धतीने आयोजित केला गेला पाहिजे जेणेकरून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात शारीरिक अंतर कायम राहील.

2. विद्यार्थी, शिक्षक आणि इतर शालेय कर्मचार्‍यांसाठी फेस मास्क किंवा फेस शिल्डचा वापर अनिवार्य असावा.

3. जे शिक्षक आणि विद्यार्थी कंटेनमेंट झोनमध्ये राहतात त्यांना शाळेत येण्याची परवानगी देण्यात येऊ नये. याखेरीज कंटेनमेंट झोनमध्ये नसलेल्या शाळांनाच सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी.

4. विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था शारीरिक अंतर लक्षात घेऊन करण्यात यावी. प्रत्येकामध्ये किमान 6 फूट अंतर असले पाहिजे.

5. कमीत कमी शिक्षकांना शाळेत बोलवावे.

6. डेस्क, खुर्च्या, डस्टर, खडू आणि पुस्तके यासह सर्व शिक्षण सामग्री देखील सॅनिटाईझ केल्या पाहिजेत.

7. शाळांना वर्गाऐवजी जास्तीत जास्त मैदानी जागा वापरायला सांगितले आहे.

8. प्रथम स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे.

9. आजारी असलेल्या मुलांनी किंवा शिक्षकांनी शाळेत जाऊ नये.

10. एसी वापरणे टाळा किंवा एसीचे तापमान 24-30 दरम्यान ठेवा.