Covid-19 Infection : जाणून घ्या कोरोना झाल्यानंतर किती दिवसांनी दुसर्‍यांना तुमच्याकडून संसर्ग नाही होणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट अतिशय जीवघेणी ठरत आहे. या वर्षी कोरोना व्हायरस संसर्ग दुप्पट वेगाने लोकांना संक्रमित करत आहे. आज भारतात ताज्या प्रकरणांची संख्या पुन्हा एकदा 4 लाखापेक्षा जास्त झाली आहे.

कोरोना व्हायरस मानवी शरीराच्या श्वसन यंत्रणेवर अटॅक करतो, ज्यामुळे रूग्णाला अनेक समस्या निर्माण होतात. सध्या बहुतांश लोक घरातच आयसोलेट होऊन उपचार करत आहेत. अशावेळी, एक प्रश्न हा निर्माण होतो की, कोरोना रूग्ण किती दिवसांपर्यंत संसर्ग दूसर्‍यांमध्ये पसरवू शकतो?

एका वेबीनारमध्ये या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. विनीत चड्ढा यांनी सांगितले की, एक कोविड-19 चा रूग्ण आजाराच्या 10 दिवसानंतर सामान्यपणे संसर्ग पसरवत नाही. याच कारणामुळे होम आयसोलेशनच्या दरम्यान जर लागोपाठ 3-4 दिवसांपर्यंत ताप किंवा इतर लक्षणे दिसली नाहीत, तर रूग्णाला निगेटिव्ह सर्टीफिकेटची आवश्यकता नाही. म्हणजे जर तुम्हाला एक आठवड्यानंतर कोरोना लक्षणे जाणवत नसतील, तर याचा अर्थ तुम्ही या आजारातून बरे झाला आहात.

मागच्या वर्षीच्या रिसर्चमध्ये ही गोष्ट आली समोर

सिंगापुर येथील राष्ट्रीय संसर्गजन्य रोग केंद्राने (एनसीआयडी) मागच्या वर्षीच्या अभ्यासात दावा केला होता की, रूग्ण 10 दिवसानंतर संसर्गमुक्त होतो. संशोधकांनी विविध हॉस्पिटलमध्ये दाखल 73 संक्रमितांकडून व्हायरसच्या प्रसाराचा धोका जाणून घेतला. तेव्हा त्यांना आढळले की, लक्षणे दिसू लागल्यापासून सात दिवसांपर्यंत रूग्णात व्हायरसची संख्या वाढणे आणि हवेत त्याचा प्रसार होण्याची शक्यता खुपच जास्त असते, परंतु आठव्या ते दहाव्या दिवसादरम्यान हा व्हायरस कमजोर पडू लागतो आणि 11वा दिवस सरता-सरता पूर्णपणे नष्ट होतो. गंभीर रूग्णांकडून सुद्धा 11 व्या दिवसानंतर संसर्गाचा धोका रहात नाही, पण त्यांच्या जीवाला धोका असल्याने काळजी घ्यावी लागते.