हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरणाच्या सुनावणीला आजपासून सुरुवात, नेमक काय घडल ‘त्या’ दिवशी ?

वर्धाः पोलीसनामा ऑनलाईन – अवघ्या महाराष्ट्राला सुन्न करणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. 3 फेब्रुवारी रोजी तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या एका प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले होते. या जळीत हत्याकांड प्रकरणाच्या सुनावणीला आजपासून सुरूवात होत आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम हे कोर्टात हजर झाले आहेत. 426 पानांच्या दोषारोपपत्रावर कामकाज चालणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. आरोपी न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे.

हिंगणघाटमधील प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने जिवंत जाळले होते. प्राध्यापिका असलेली ही तरुणी खेड्यावरून हिंगणघाटला ये-जा करत होती. सकाळी ती हिंगणघाटमधल्या नंदोरी चौकात जेव्हा ती आली त्यावेळी आरोपी हा दडून बसला होता. त्याच्या एका हातात टेंभा होता आणि दुसऱ्या हातात पेट्रोलची बाटली होती. तिला पाहताच त्याने एका हाताने तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि दुसऱ्या हाताने टेंभ्याने आग लावली. यानंतर ती जळत होती. मात्र पीडित शिक्षिका जळताना काही लोकांना पाझर फुटला आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत शिक्षिका 40 टक्के भाजली होती. यानंतर मात्र तरुणी जमिनीवर कोसळली आणि सुन्न पडून होती. तातडीने काहीजणांनी तिला रुग्णालयात दाखल केले व उपचार सुरू केले.
यापूर्वीही आरोपीने तिला त्रास दिला होता. त्यावेळी पीडित तरुणीच्या पालकांनी त्याला समज दिली होती. पीडितेला पुढील उपचारासाठी नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये हलवले होते. तिथे तिच्यावर उपचार सुरू होते. तिचा चेहरा आणि पूर्ण डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला गेला होता. पीडितेच्या श्वसन नलिकेत धूर गेल्याने तिला श्वसनाचा त्रास होत होता.

दरम्यान, पीडित तरुणीच्या स्कीनच्या पाचही लेन्स जळाल्या होत्या. शिवाय तिच्या दोन्ही डोळ्यांना सुज आली होती. ती बघू शकत नव्हती आणि ती तोंड पूर्णपणे उघडू शकतही नव्हती. अखेर उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

असा आहे ‘हिंगणघाट’चा घटनाक्रम

-3 फेब्रुवारीला सकाळी 7.15 वाजता हिंगणघाटच्या नंदोरी चौकात तरुणीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

-सकाळी 7.30 वाजता जिल्हा उपरुग्णालयात उपचारासाठी दाखल

-सकाळी 7.45 वाजता काही पोलीस उपरुग्णालयात व नंदोरी चौकातील घटनास्थळी दाखल

-सकाळी 8.15 वाजता तरुणीला उपचारार्थ नागपूर येथे हलविले

-दुपारी 3 वाजता आरोपीला टाकळघाट येथे अटक

– सायंकाळी 5 वाजता बुट्टीबोरी पोलिसांनी आरोपीला हिंगणघाट पोलिसांच्या स्वाधीन केले.

-9 फेब्रुवारी- पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर संपली.

-19 फेब्रुवारी- आरोपी विकेश नगराळे याचा आत्महत्येचा प्रयत्न.

-हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची राज्य सरकारची घोषणा

-प्रसिद्ध वकिल उज्ज्वल निकम हे सरकारतर्फे पीडितेची बाजू मांडणार आहेत.