कोण आहे ती अभिनेत्री, जिची बुमराहशी लग्नाची होतेय चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने क्रिकेटमधून तात्पुरता ब्रेक घेतल्यानंतर सगळीकडे त्याच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. त्याचे लग्न कोणाशी होणार, याबाबत अद्याप खुलासा करण्यात आला नव्हता. परंतु आता जसप्रीत बुमराह दक्षिण अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनसोबत लग्न करणार असल्याची बातमी आहे. बुमराहचे लग्न गोव्यात होणार असल्याचे समजते. मात्र, अद्याप या लग्नाची औपचारिक घोषणा झालेली नाही.

अनुपमा परमेश्वरन ही मल्याळी सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तमिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2015 साली ‘प्रेमाम’ या चित्रपटाद्वारे अनुपमाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटातील निविन पॉली हा तिचा सहकलाकार होता. या चित्रपटातून आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षक आणि समीक्षकांना चांगलेच प्रभावित केले. ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्रीचा पुरस्कारही देण्यात आला होता. यानंतर, अनुपमाने तेलुगु चित्रपटांमध्ये प्रवेश केला आणि A Aa सह आपला चित्रपट प्रेमामच्या तेलगू व्हर्जनमध्ये काम केले. अनुपमाने कोडी या चित्रपटापासून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ज्यात तिने धनुष सोबत काम केले.

2019 मध्ये अनुपमाने कन्नड सिनेसृष्टीत नटसर्वभवमा या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. 2020 मध्ये, तिने नेटिफ्लिक्स फिल्म मणियाराईल अशोकन या चित्रपटाद्वारे डिजिटलमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अनुपमाने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते. आजकाल ती आपल्या यूट्यूब शॉर्ट फिल्म Freedom @ Midnight साठी चर्चेत आहे. तसेच पुरस्कारांविषयी बोलायचे झाल्यास अनुपमाने तेलगू चित्रपट प्रेमाम मधील तिच्या कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा 2nd IIFA Utsavam पुरस्कार जिंकला. याशिवाय 2017 मध्ये ‘ A Aa ’ चित्रपटासाठी तिला ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ साठी Zee Cinemalu Award मिळाला होता.

अनुपमा परमेश्वरनने केरळमधील सीएमएस कॉलेज कोट्टायममधून कम्युनिकेशनिव्ह इंग्रजीचे शिक्षण घेतले आहे. दरम्यान, तिने अभिनयासाठी शिक्षण मध्यभागीच सोडले. दरम्यान, बुमराह आणि अनुपमा यांची नावे एकमेकांशी जोडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही 2020 मध्ये दोघे सोबत असल्याच्या चर्चा होत्या. त्यावेळी अनुपमा म्हणाली की, ती बुमराहला ओळखत देखील नाही, तिला एवढेच माहित आहे की, तो एक क्रिकेटपटू आहे.