डीएसकेंविरोधात तक्रारी असल्यास संपर्क साधावा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील डीएस ग्रुप अँड कंपनीत विविध योजनेत गुंतवलेले 9 लाख रूपये तसेच त्याचे व्याज मुदत पूर्ण होऊनही परत न दिल्याने डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर सांगलीत बुधवारी (दि. 23) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अन्य कोणाची या ग्रुपकडून फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

दीपक सखाराम कुलकर्णी, हेमंत दीपक कुलकर्णी, शिरीष सखाराम कुलकर्णी (सर्व रा. डीएसके हाऊस, जंगली महाराज रोड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी किरण अनंत कुलकर्णी (वय 65, रा. नागराज कॉलनी, विश्रामबाग, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.

किरण कुलकर्णी यांनी कंपनीच्या विविध योजनांमध्ये 6 सप्टेंबर 2014 ते 13 ऑक्टोबर 2015 या काळात 8 लाख 95 हजार रूपये वेळोवेळी भरले होते. त्यांच्या ठेवींची मुदत पूर्ण झाल्यानंतरही कंपनीने त्यांची मुद्दल तसेच त्यावरील व्याज परत दिले नाही. याबाबत त्यांनी कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र त्यांना पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी बुधवारी याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदार, ठेवीदारांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.