पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरतीबाबत MPSC चा मोठा निर्णय ! मुलाखतीसाठी आता शारीरिक चाचणीत 60 गुण आवश्यक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूढे पीएसआय पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 गुण अनिवार्य असणार आहेत. म्हणजेच उमेदवाराच्या क्वालिफिकेशनसाठी आता मैदानी गुणही ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे आता पीएसआय भरतीमध्ये पुर्व परीक्षा, मुख्य परीक्षेतील गुणांसह, शारीरिक चाचणीत 60 गुण असतील तरच उमेदवार पुढील मुलाखतीस पात्र ठरणार आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. लोकसेवा आयोगाने एका निवेदनातून ही माहिती दिली आहे.

MPSC च्या 2020 मध्ये निघालेल्या जाहिरातीसाठी हा नियम लागू असणार आहे. तशी माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे. यापूर्वी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र, आता अंतिम गुणवत्ता यादीतून शारीरिक चाचणीचे गुण वगळण्यात आले आहेत. हे गुण आता पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

पीएसआय पदाच्या भरतीसाठी शारीरिक मानकांमध्ये पुरुषांसाठी गोळाफेक 15 गुण, पूलअप्स 20 गुण, लांब उडी 15 गुण तर धावण्यात 50 गुण अशी सुधारित मानके तयार करण्यात आली आहेत. तर महिलांसाठी गोळाफेक 20 गुण, धावण्यात 50 गुण, लांब उडी 30 गुण अशी मानके तयार करण्यात आली आहेत. या शरीरिक चाचणीमध्ये 60 गुण मिळाले तरच उमेदवार पुढील मुलाखतीसाठी पात्र ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

UPSC परीक्षांच्या मुलाखती स्थगित
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरी सेवा परीक्षा 2020 च्या मुलाखती पुढे ढकलल्या आहेत. 20 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनातून ही माहिती मिळाली आहे. युपीएससीमार्फत दरवर्षी तीन टप्प्यात सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा घेण्यात येते. यामध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश आहे. या मध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी निवडले जातात.