महानगरपालिकेत समावेशाच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत बांधकामात वाढ; PMRDA चे मात्र याकडे दुर्लक्ष, वाघोली परिसरातील प्रकार

शिक्रापुर : पुणे शहराजवळील वाघोली परिसराचा झपाट्याने विकास होत असून वाघोली हे मोठे उपनगर म्हणून ओळखले जावू लागले आहे. लवकरच वाघोलीचा पुणे महानगरपालिकेत देखील समावेश होणार आहे. या अनुषंगाने अनेक व्यवसायिक तसेच छोटी-मोठी बांधकामे जोरात सुरु आहे,तर अनेक ठिकाणी व्यवसायिक गाळ्यांची देखील बांधकामे सुरू आहेत.या सर्व बांधकामांसाठी पीएमआरडीएची परवानगी घेणे आवश्यक असताना देखील विनापरवाना कामे सुरू आहेत.

महानगरपालिकेत वाघोलीचा समाविष्ट होण्याच्या आधी ही बांधकामे पूर्ण करून घेण्याकडे या सर्वांचा कल आहे.माञ या बांधकामाकडे पीएमआरडीए जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वाघोलीतील सजन नागरिक करत आहे.

या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून यावर लवकरात लवकर कारवाई होणे अपेक्षित आहे.याचबरोबर अनधिकृत बांधकाम प्रकरणी शासकीय यंत्रणेतील संबंधित प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून काम केले तर राज्यातील अनधिकृत बांधकामांना व ती उभारण्यास मदत करणाऱ्यांना नक्कीच चाप बसेल.

वाघोलीत अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असताना देखील या अनधिकृत बांधकामची व अपूर्ण बांधकामाची महानगरपालिकेत समाविष्ट होण्याच्या आधी ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्यासाठी लगबग सुरू असल्याबाबत परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.याकडे देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे..