Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये सामंजस्य करार ! शालेय सुविधांसाठी ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ची 3 कोटींची मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ ‘आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थे’च्या शाळांसाठी ३ कोटी रुपयांची मदत करणार आहे. याबाबत इंद्राणी बालन फाऊंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग (Art of Living) यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला.

‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने शैक्षणिक क्षेत्रात मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यातूनच हा सामंज्यस्य करार करण्यात आला. यावेळी अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) आणि त्यांच्या भगिनी भानुमती यांची उपस्थिती होती. हा करार पुणे येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या त्रिवेणी आश्रम येथे करण्यात आला. या कराराप्रमाणे ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ तीन गावातील शाळा बांधण्यासाठी मदत करणार आहे. त्यासोबतच येथे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या इतर पायाभूत सुविधांचीही उभारणी करण्यात येणार आहे.

‘इंद्राणी बालन फाऊंडेशन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिखर शिंगणापूर येथील शाळेच्या चार वर्गखोल्या, स्वच्छतागृह आणि वर्गाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तसेच येथे विद्यार्थ्यांसाठी ३२ आसनी स्कूल बस सुध्दा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या दहिगाव येथील शाळेसाठी चार वर्गखोल्या, स्वच्छतागृह आणि वर्गाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यासोबतच ‘देवाची झाली’ या गावातील शाळेत ही चार वर्गखोल्या, स्वच्छतागृहाचे बांधकाम आणि वर्गाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या कामांसाठी अंदाजे किंमत ३ कोटी रुपये लागणार आहेत. ही कामं तातडीने पूर्ण करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याचा विद्यार्थ्यांना लाभ कसा होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

‘‘अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातून देशभर अध्यात्मिक, शैक्षणिक, पर्यावरण आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केले जाते. त्यांचं हे काम सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे. अशा चांगल्या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा या भावनेतून ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या शाळांना मदत करण्यात येत आहे. याचा त्या-त्या गावातील विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि येथील विद्यार्थीही उद्या मोठं झाल्यावर सामाजिक कार्याचा वसा पुढं घेऊन जातील, असा विश्वास आहे.’’