इंटरनॅशनल शूटर वर्तिका सिंहने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरूद्ध दाखल केला खटला, जाणून घ्या काय आहेत आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंटरनॅशनल शूटर वर्तिका सिंहने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि अन्य दोन लोकांविरूद्ध खटला दाखल केला आहे. शूटर वर्तिका सिंहने स्मृती इराणी यांच्यावर केंद्रीय महिला आयोगाची सदस्य बनवण्याच्या नावावर 25 लाख रुपयांची डिमांड करण्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी वर्तिका सिंहने स्मृती इराणी आणि त्यांचे खासगी सचिव विजय गुप्ता आणि डॉ. रजनीश सिंह यांच्याविरूद्ध खटला दाखल केला आहे.

शूटर वर्तिका सिंहच्या वकीलांनी सांगितले की, एमपी-एमएलए न्यायालयाने सुनावणीसाठी 2 जोनवारीची तारीख ठरवली आहे, ज्यानंतर हे ठरणार आहे की, प्रकरण त्यांच्या अधिकारक्षेत्रात येते किंवा नाही.

काय आहे स्मृती इराणी यांच्यावर आरोप
रिपोर्टनुसार, प्रतापगढची रहिवाशी असलेल्या वर्तिका सिंहने स्मृती इराणी यांच्यावर आरोप करताना म्हटले की, मंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी केंद्रीय महिला आयोगाचे सदस्य बनवण्याचे बनावट लेटर जारी केले होते. वर्तिका सिंहने म्हटले आहे की, अगोदर महिला आयोगाचे सदस्य बनवण्यासाठी एक कोटीचा रेट सांगण्यात आला होता. त्यानंतर सांगण्यात आले की, तुमचे प्रोफाइल चांगले असल्याने तुमचे काम 25 लाख रुपयांत सुद्धा होईल.

शूटर वर्तिका सिंहचा दावा आहे की, स्मृती इराणीने राष्ट्रीय महिला आयोगाची सदस्य बनवण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली होती. शूटर वर्तिका सिंहने हा सुद्धा आरोप केला आहे की, स्मृती इराणी यांचे खासगी सचिव विजय गुप्ता आणि डॉ. रजनीश सिंहपैकी एका व्यक्तीने अश्लील प्रकारे चर्चा केली होती.

वर्तिका सिंहचे म्हणणे आहे की, तिने प्रकरणाची तक्रार अनेक जबाबदार अधिकार्‍यांकडे केली परंतु सुनावणी झाली नाही. ज्यानंतर तिने कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. वर्तिका सिंहकडून कोर्टात अश्लील चॅट आणि व्हिडिओ पुरावे म्हणून सोपवले आहेत.

23 नोव्हेंबर 2020 ला, विजय गुप्ताने शूटर वर्तिका सिंह आणि अन्य एका व्यक्तीच्याविरोधात अमेठी जिल्ह्याच्या मुसाफिरखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये त्यांच्यावर निराधार आरोप करणे आणि त्यांची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा अरोप केला होता. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शूटर वर्तिका सिंहच्याविरूद्ध एफआयर दाखल केला होता. मात्र, वर्तिका सिंहने दावा केला की, तकार यासाठी केली आहे, कारण तिने त्यांचा भ्रष्टचार उघड करण्याची धमकी दिली होती.