नेत्यानाहू यांच्या अडचणी आणखी वाढल्या, इस्त्रायलमध्ये संसद विसर्जित, 2 वर्षात चौथ्यांदा होणार निवडणूक

जेरूसलेम : इस्रायलमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाचा सामना करत असलेले पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. बुधवारी इस्त्रायलच्या खासदारांनी संसद विसर्जित करण्याच्या प्रस्तावास प्राथमिक मतदानाने मंजूरी दिली.

यासोबतच देश दोन वर्षांपेक्षा कमी काळात चौथ्यांदा सार्वत्रिक निवडणुकांच्या जवळ पोहचला आहे. संसद विसर्जित होताच नेत्यानाहू यांचा सत्ताधारी लिकुड पक्ष आणि बेनी गेंतज यांच्या ब्ल्यू अँड व्हाइट पक्षातील असंतुलित आघाडीसुद्धा जवळपास संपुष्टात आली आहे.

नॅसेट (इस्त्रायली संसद) विसर्जित करण्याचा प्रस्ताव विरोधी पक्षांकडून मांडण्यात आला, जो सरकारमध्ये सहभागी ब्ल्यू अँड व्हाइट पक्षाच्या खासदारांचे सुद्धा समर्थन मिळाल्याने 120 सदस्यांच्या सभागृहात 61-54 च्या मतांसह मंजूर झाला.

आता हा प्रस्ताव विधान समितीच्या समोर ठेवला जाईल, जिथे पुढील आठवड्यापर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. या दरम्यान, गेंतज आणि नेत्यानाहू यांच्यातील मतभेद सोडवण्यासाठी चर्चा सुरू राहण्याची शक्यता आहे.

या प्रस्तावावर संरक्षण मंत्री पद सांभाळणारे बेनी गेंतज यांच्या वक्तव्याच्या एक दिवसानंतर मतदान करण्यात आले आहे, ज्यामध्ये गेंतज यांनी म्हटले होते की, त्यांचा ब्ल्यू अँड व्हाइट पक्ष प्रस्तावाच्या समर्थनात मतदान करणार आहे.

ठरल्याप्रमाणे पंतप्रधान पद सांभाळणाचे दावेदार गेंतज यांनी नेत्यानाहू यांच्यावर आपले राजकीय हित साधण्यासाठी सातत्याने बजेटच्या मुद्द्यावर जनतेला मूर्ख बनवल्याचा आरोप सुद्धा केला होता.

गेंतज यांनी अखेरच्या वेळी मतदान टाळण्याची संधी सुद्धा नेत्यानाहू यांना दिली. त्यांनी दोन्ही पक्षांमध्ये यापूर्वी ठरल्याप्रमाणे दोन वर्षीय बजेट मंजर करण्याचे आवाहन नेत्यानाहू यांना केले आहे. जर नेत्यानाहू यांनी 23 डिसेंबरपर्यंत बजेटला मंजरी दिली तर सर्वकाही ठिक होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सध्या इस्त्रायलला कोरोना व्हायरस महामारीमुळे मार्चपासून आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय लॉकडाऊन घोषित करावे लागल्याने देशात बेरोजगारीची संख्या 20 टक्के झाली आहे. मात्र, नेत्यानाहू यांना अजूनही देशात लोकप्रिय मानले जात आहे.