अभिनेता जॉन अब्राहम साकारतोय डॉनची भूमिका, कोण होता डीके राव ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता जॉन अब्राहम हा आपल्या अ‍ॅक्शन चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे. असाच एक फुलपॅक अ‍ॅक्शन सीननं भरलेला एक नवा चित्रपट घेऊन जॉन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मुंबई सागा’ असे या अ‍ॅक्शन चित्रपटाचे नाव असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शीत झाला आहे. ट्रेलरमध्ये जॉन अंडरवर्ल्ड डॉन अमर्त्य रावच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात तो तीन वेळा पोलीस एन्काउंटरमधून वाचलेल्या अमर्त्यची भूमिका साकारत आहे.

कोण होता अमर्त्य राव उर्फ डीके राव ?

अमर्त्य राव याला गुन्हेगारी विश्वात डीके राव या नावाने ओळखळं जातं. मुंबईतील माटुंगा परिसरात एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला अमर्त्य पुढे जाऊन गुन्हेगारी विश्वातला डॉन बनला. 80 च्या दशकामध्ये मुंबईतील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. बेरोजगारी, गरीबी, गिरण्यांचे संप यामुळे तरुण वर्ग गुन्हेगारी विश्वाकडे मोठ्या प्रमाणात वळले. अन् त्याच काळात अमर्त्य राव याने देखील गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले.

अमर्त्य राव हा छोटा राजनच्या टोळीसाठी काम करत होता. बँक लुटने, हप्ता वसुली करणे, धमकावणे, खून करणे या सारख्या गंभीर आरोपांखाली तो कित्येकवेळा तुरुंगात जाऊन आला. आश्चर्याची बाब म्हणजे तो तब्बल तीन वेळा पोलिस एन्काउंटरमध्ये वाचला होता. अशा या नामचीन गुंडावर ‘मुंबई सागा’ हा चित्रपट साकारण्यात आला असून या चित्रपटात जॉन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

पोलिस असो किंवा राजकारणी कोणालाही न घाबरणारा आणि आपल्या भूमिकेवर ठाम असणारा अमर्त्य राव उर्फ डीके राव अखेर राजकारण्यांच्या जाळ्यात कसा अडकला जातो ? तो गुन्हेगारी विश्वाकडे कसा वळतो ? चोर पोलिसांच्या खेळात नेमकं कोण जिंकतं ? हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट येत्या 19 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केलं आहे.