पत्रकार संगीता भापकर यांना जागतिक कृषी पर्यटन २०२१ पुरस्कार

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन – बारामती तालुक्यातील मोरगांव येथील पत्रकार संगीता हनुमंतराव भापकर यांना कृषी पर्यटन विकास संस्था व जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार निवड समितीच्या वतीने दिला जाणारा ‘वर्ल्ड अँग्री टुरिझम अँवार्ड-२०२१’ नुकताच प्राप्त झाला आहे.

चौदाव्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त ‘कृषी पर्यटनाव्दारे महिला शेतकऱ्यांच्या उद्यमशीलतेचा विकास’ हे उद्दीष्ट ठरविण्यात आले होते. यानुषंगाने जागतिक कृषी पर्यटन निवड समितीने ‘वर्ल्ड अँग्री टुरिझम अँवार्ड-२०२१’ हा पुरस्कार वेगवेगळ्या देशातील कृषी पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अकरा महिलांना जाहिर केला होता. नुकतीच १५ व १६ मे रोजी महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळ, पर्यटन विकास संस्था यांच्या वतीने दोन दिवस ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली.

परिषदेत संगीता भापकर यांना ऑनलाईन पध्दतीने सदरचा पुरस्कार जाहीर करून प्रदान करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्याच्या पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर, राज्य पर्यटन विकास महांडळाचे संचालक आशुतोष सलील, डॉ. धनंजय सावळकर, कृषी पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक पांडुरंग तावरे आदी उपस्थित होते. आफ्रीका, रवांडा, स्पेन, इडली, फ्रान्स, फिलीपाईन्स अशा विविध देशातील महिलांना यानिमित्त गौरविण्यात आले. भारतातून संगीता भापकर यांच्यासह डॉ. अश्विनी कोळेकर, नंदा कासार, नंदा नरोटे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

बारामतीतील तरडोली या जिराईत पट्ट्यात निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र स्थापन करून ग्रामीण व जिराईत भागातील महिलांसाठी प्रेरणादायक कार्याची दखल घेत
संगिता भापकर यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे पांडुरंग तावरे यांनी सांगितले.*

*कृषी पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्कार….*

बारामतीच्या जिरायत भागात प्रतिकूल परिस्थिती शेती आणि शेतीपुरक व्यवसायाला कृषी पर्यटनाची जोड देत ग्रामीण संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र करत आहे.यामुळे ग्रामीण भागातील स्थानिक महिलांना व्यावसायिक दृष्टीकोनातून रोजगार आणि सक्षमीकरणाच्या संधी कृषी पर्यटनामुळे उपलब्ध झाल्या आहेत. या पुरस्काराबद्द्ल संगिता भापकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.