‘तहलका’चे माजी मुख्य संपादक तरूण तेजपाल बलात्काराच्या गुन्हयातून 8 वर्षांनंतर ‘निर्दोष’, गोव्याच्या सेशन कोर्टाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  रेप केसमध्ये पत्रकार तरुण तेजपाल यांना मोठा दिलासा मिळला आहे. 8 वर्षानंतर गोवाच्या सेशन कोर्टाने तरुण तेजपाल यांना मुक्त केले आहे. तहलका मॅगझीनचे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल यांच्यावर 2013 मध्ये गोव्याच्या एका लक्झरी हॉटेलच्या लिफ्टमध्ये महिला सहकार्‍याचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.

पत्रकार तरुण तेजपाल यांच्यावर महिला सहकार्‍यानेच लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर तरुण तेजपाल यांच्या विरोधात गोवा पोलिसांनी नोव्हेंबर 2013 मध्ये एफआयआर दाखल केला होता. नंतर तरुण तेजपाल यांना अटक करण्यात आली होती. तरुण तेजपाल मे 2014 पासून जामीनावर बाहेर आहेत. गोवा पोलिसांनी फेब्रुवारी 2014 मध्ये त्यांच्याविरूद्ध 2846 पानांचे चार्जशीट दाखल केले होते.

या कलमांखाली चालला खटला

पत्रकार तरुण तेजपाल यांच्यावर भा.दं.वि. कलम 342 (चुकीच्या पद्धतीने रोखणे), 342 (वाईट हेतूने कैद करणे), 354 (प्रतिमा हनन करण्याच्या हेतूने हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे), 354-ए (लैंगिक छळ), 376 (2) (महिलेवर अधिकार पदावर असलेल्या व्यक्तीद्वारे बलात्कार) आणि 376 (2) (के) (नियंत्रणीय स्थितीत असलेल्या व्यक्तीद्वारे बलात्कार) च्या अंतर्गत खटला चालला.

काय होता आरोप

तरुण तेजपाल यांच्यावर सहकारी महिला पत्रकाराने आरोप केला होता की, गोवामध्ये तहलकाचा एक इव्हेंट होता, त्या रात्री जेव्हा ती गेस्टला खोलीपर्यंत सोडून परतत असताना, याच हॉटेलच्या ब्लॉक 7 च्या एका लिफ्टच्या समोर तिला तिचा बॉस तरुण तेजपाल भटले. तेजपाल यांनी गेस्टला पुन्हा जागे करण्याचे सांगून अचानक तिला त्याच लिफ्टच्या आत खेचले.

गोवा पोलिसांना दिलेल्या जबाबात मुलीने म्हटले होते की, मला काही समजण्याच्या आतच तेजपाल यांनी लिफ्टची बटने अशा पद्धतीने दाबण्यास सुरूवात केली की ती थांबू नये आणि दरवाजा उघडू नये आणि त्याचवेळी तेजपाल यांनी याच बंद लिफ्टमध्ये जे काही केले, ज्याचे रहस्य उघड झाले तेव्हा तरुण तेजपाल यांच्याच जीवनात ‘तहलका’ झाला होता.