ज्युबिलंट इंग्लिश मिडियम स्कुलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – नीरा( ता.पुरंदर) येथील ज्युबिलंट इंग्लिश मिडियम स्कुलचा ३५ वा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. मुलांना लहान वयात प्रत्येक सण-उत्सवांची ओळख व्हावी याकरिता सर्व सणांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी विविध वेशभुषेत बहारदार
नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली.

प्रमुख पाहुणे म्हणुन अभिनेते विनोद शिंदे होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले की, नीरा सारख्या ग्रामिण भागात ‘ ज्युबिलंट ‘ स्कुल सारख्या इंग्रजी माध्यमाच्या शाळात लहान मुले शिकत आहेत हे कौतुकास्पद आहे. कोणतीही गोष्ट मनावर घेतली तर ती अशक्य नसते. एकदा जिद्द केली तर ती पुर्ण करावयाची असते. गुरूजनांचा आदर करावा. आजची मुले उद्या भारताचे भवितव्य आहेत.

‘ मी आनंदी उत्साही, मी सदा प्रफुल्लित आहे.’ हे वाक्य दररोज म्हटल्यास नेहमी आनंदी राहाल असा प्रेमाचा सल्ला देत विनोद शिंदे यांनी त्यांच्या एकेक कवितेचा दाखला देत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्युबिलंट लाईफ सायन्सेस लि. चे उपाध्यक्ष सतिश भट होते.
यावेळी ज्युबिलंट कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर, अकाऊंंट मँनेजर मुकेश सिंग,
एच.आर. सुर्यकांत पाटील , ज्युबिलंट फाऊंडेशनचे अजय ढगे, तुकाराम झांबरे , स्नेहसंमेलन प्रमुख विजया गवळी , पालक, विद्यार्थी, शिक्षिका आदी उपस्थित होते.

पालखी सोहळा, श्रीकृष्ण जन्मोत्सव, मंगळागौरी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, गरबा डान्स, दिवाळी उत्सव, तुलसी विवाह, मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर तिळगुळ घ्या, रमजान ईद या सारख्या प्रमुख सणांच्या आधारित विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून पालकांची व पाहुण्यांचे मने जिंकले. कराटे डेमोने कार्यक्रमाची सांगता झाली.

स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका रूपाली जाधव यांनी केले . सुत्रसंचालन शिक्षिका अंबिका नेवसे, अंजली गारूळे यांनी केले तर आभार शिक्षिका सोनम निगडे यांनी मानले.