16 लाखाच्या बोकडाची चोरी केल्याप्रकरणी आटपाडीतील तिघे पोलिसांच्या ताब्यात

पोलिसनामा ऑनलाईन – येथील आंबेबन मळ्यातील (आटपाडी, जि. सांगली) शेतकरी सोमनाथ जाधव यांचा १६ लाख रुपये किमतीचा सहा महिन्यांच्या बोकड चोरीस गेला होता. येथील पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी कऱ्हाड येथून बोकड चोरून नेणाऱ्या आटपाडीतील तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

सोमनाथ जाधव हे येथील आंबेबन मळ्यात कुटुंबीयांसोबत राहतात. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री त्यांच्या वाड्यातून अज्ञात चोरट्यांनी गाडीत बोकड टाकून पळवून नेला होता. आटपाडी शहरातील जागोजागी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही गाडी जाताना चित्रीकरण झाले होते. त्या गाडीचा तपास आणि माहिती घेऊन पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले होते. सुरुवातीला या संशयितांनी हात वर केले होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा हिसका दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. या तीन संशयितांनी मध्यरात्री गाडीमध्ये बोकड टाकून कऱ्हाड येथील डोंगरावर नेऊन ठेवला होता. तेथून बोकड पोलिसांनी ताब्यात घेतला, तसेच गाडी आणि तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अवघ्या चोवीस तासांत चोरीस गेलेल्या बोकडाचा पोलिसांनी छडा लावला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आटपाडी येथे कार्तिक महिन्यात दरवर्षी होणारी ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाची यात्रा यावर्षी रद्द केली होती. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दोन दिवस शेळ्या- मेंढ्यांचा बाजार भरवला होता. या बाजारांमध्ये सोमनाथ जाधव यांनी सहा महिन्यांचा बोकड बाजारामध्ये आणला होता. त्याला पंधरा लाखांची मागणी झाली होती.