पैशाच्या वादातून तरुणाच्या डोक्यात खुपसली गाडीची चावी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

येथील नेवासा तालुक्यातील घोडेगावमध्ये पैशांच्या वादातून गाडीची चावी डोक्यात खुपसवल्याची गंभीर घटना घडली आहे . जखमी तरुणाला उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.

प्रतीक आरण असे याप्रकरणात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पैशाच्या वादातून मंगळवारी रात्री प्रतीकला फोनवरुन शिवीगाळ करण्यात आली होती. नंतर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास प्रतीकला घोडेगावला चौकात तिघांनी मारहाण केली. या मारहाणीत अक्षय चेमटे नावाच्या तरुणाने प्रतीकच्या डोक्यात चावी खुपसली. चावी डोक्यात खुपसल्यानंतर त्यावर जोरानं दाबल्याने ती थेट प्रतीकच्या डोक्यात मेंदूपर्यंत घुसली. यामुळे प्रतीक जमिनीवर कोसळला.

यानंतर प्रतीकला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तो सध्या आनंदऋषी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन चावी काढण्यात आली असून, सध्या प्रतीकची तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.