बॅंक खात्याशी रजिस्टर्ड मोबाईल नंबर बदलायचाय मग ‘नो-टेन्शन’, घरबसल्या करा ‘हे’ काम, जाणून घ्या
नवी दिल्लीः वृत्तसंस्था – बँक खात्याशी (Bank Account) मोबाइल नंबर (Mobile Number) जोडलेला असणे किती महत्त्वाचे आहे, हे गेल्या काही वर्षांत आपल्याला समजले आहे. तुमच्या बॅंक खात्याशी आधीपासून रजिस्टर्ड केलेला मोबाईल नंबर बदलवायचा असेल तर तुम्ही बँकेत न जाता ते घरी बसून करू शकता. कोणत्याही बँकेच्या खात्याशी जोडलेला मोबाइल नंबर बदलायचा असेल, तर काही अगदी सोप्या अशा स्टेप्समध्ये तुम्ही तो नंबर बदलू शकता. जाणून घ्या ते कसे.
बँक खात्याशी मोबाइल नंबर जोडलेला असेल, तर खात्याशी संबंधित अगदी बारीकसारीक गोष्टींचे अपडेट्सही आपल्याला मिळतात. पण बँक खात्याशी जोडलेल्या नंबरला काही समस्या निर्माण झाली किंवा आपला मोबाइल नंबर बदलला, तर मोठी अडचण होऊ शकते. अलीकडे खोट्या मोबाइल नंबरच्या साहाय्याने बँकेचे अनेक घोटाळे केले जात आहेत. तसे काही झाले तर बँक खाते रिकामे होऊ शकते. त्यामुळे आपला मोबाइल नंबर बदलला, तर बँकखात्याशी निगडित नंबरही लगेचच बदलून घेतला पाहिजे.
ऑनलाइन अर्थात घरसबल्या असा बदला बँकेमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबर
– तुमच्याकडे नेटबँकिंगची (Netbanking) सुविधा असेल, तर तुम्ही अगदी घरसबल्या मोबाइल किंवा कम्प्युटरद्वारे बँक खात्याशी जोडलेला नंबर बदलू शकता.
– आपण एक उदाहरण पाहू या. तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियात (SBI) खातं असेल, तर सर्वांत आधी तुम्हाला नेटबँकिंगच्या वेबसाइटवर म्हणजे www.onlinesbi.com या लिंकवर जावे लागेल.
– त्यानंतर तुम्ही जेव्हा अकाउंटमध्ये लॉगिन कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर पर्सनल डिटेल्स या पर्यायावर क्लिक करावं. त्यानंतर तुम्हाला प्रोफाइल पासवर्ड द्यावा लागेल.
– पासवर्ड सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ई-मेल आयडी आणि तुमचा जुना मोबाइल नंबर दिसेल. तसेच मोबाइल नंबर बदलण्याचा पर्यायही तिथे उपलब्ध असेल. तिथे दिलेल्या सूचनांचा अवलंब करून तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर बदलता येईल.
ऑफलाइन पद्धत
इंटरनेट बँकिंगची सुविधा तुम्ही वापरत नसाल, तर तुम्हाला बँकेत जाऊन मोबाइल नंबर बदलून घ्यावा लागेल. त्यासाठी तुमचे खाते बँकेच्या ज्या शाखेमध्ये आहे, तिथे जाऊन मोबाइल नंबर बदलण्याकरिताचा फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. त्यासोबत तुम्हाला तुमच्या पासबुकची आणि आधार कार्डाची प्रतही द्यावी लागेल. त्यानंतर बँक त्यांच्याकडे नोंदणीकृत असलेला तुमच्या खात्याशी संलग्न मोबाइल नंबर बदलून देईल. तुमचा मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, वास्तव्याचा पत्ता यांमध्ये काहीही बदल झाला, तर लगेचच ही माहिती बँक खात्यात बदलून घेणे ही आपली जबाबदारी आहे. कारण समजा दुर्दैवाने कधी काही संशयास्पद व्यवहार झालेच, तर त्या वेळी आपली माहिती अपडेट असेल तरच बँक आपल्याशी संपर्क साधून आपल्याला माहिती देऊ शकेल.