लस टोचल्यानंतर PM मोदी नेमकं काय म्हणाले, परिचारीका पी. निवेदिता यांनी केला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवार (दि. 1) पासून प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी लसीचा पहिला डोस आज सकाळी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला. दरम्यान, लस दिल्यानंतर पंतप्रधान मोदीनी काय प्रतिक्रिया दिली याचा खुलासा त्यांना लस दिलेल्या परिचारीका पी. निवेदिता यांनी केला आहे. सरांना भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला. लस दिल्यानंतर त्यांनी आम्हाला तुम्ही मूळच्या कुठल्या आहात, असा प्रश्न केला. तसेच प्रतिक्रिया देताना लस दिली सुद्धा हे देखील मला समजल नसल्याचेही ते म्हणाले असे निवेदिता यांनी सांगितले. दरम्यान यावेळी त्यांच्यासोबत एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया हे देखील उपस्थित होते. पंतप्रधानांनी लस घेतल्यानंतर सर्व प्रोटोकॉलचे पालन करत त्या ठिकाणी अर्धा तास थांबले होते.

एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलदगतीने काम केल ते कौतुकास्पद आहे, तसेच लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना आवाहन करत भारत कोरोनामुक्त बनवू या असे मोदीनी म्हटले आहे. तर परिचारीका निवेदिता म्हणाल्या की, गेल्या 3 वर्षांपासून आपण एम्समध्ये कार्यरत आहोत आणि सध्या कोरोना लसीकरण केंद्रात काम करत आहे. आज सकाळी पंतप्रधान मोदी हे लसीकरणासाठी आल्याचे समजले. त्यांना लस देण्यासाठी मला बोलावल तेंव्हा त्यांना भेटून खुप आनंद झाला. पी निवेदिता या मूळच्या पुडुचेरीच्या रहिवासी आहेत. पंतप्रधान मोदीना लस देताना त्यांच्यासोबत परिचारीका रोसम्मा अनिल या देखील उपस्थित होत्या.