‘ही’ कंपनी आपल्या Electric Scooters मध्ये वापरणार ‘पॉवरफुल’ बॅटरी, त्यानंतर एका चार्जमध्ये 220 KM

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे गेल्या काही वर्षापासून लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे देशातील आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहन उत्पादक कंपनी कोमाकीने नुकतेच दुचाकी वाहनांचे मॉडेल बाजारात आणले आहे. आता कंपनी विशेष Li-ion बॅटरी तंत्रज्ञानावर काम करत असून पेटंटच्या कारणांमुळे अद्याप याविषयी फारशी माहिती दिली नाही. परंतु कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही बॅटरी इन हाऊस तयार केली जाणार आहे.

एका वृत्तानुसार, या बॅटरीत वापरलेला शेल कोरियातून आयात केलेला असून तो आपल्या देशात असेंबल केला जाणार आहे. वजनाने ही बॅटरी अगदी हलकी असून फास्ट चार्जिंग सिस्टमला सपोर्ट करते. बॅटरी सिंगल चार्जमध्ये कमीतकमी 170 किमी आणि इको मोडमध्ये जास्तीत जास्त 220 किमी ड्रायव्हिंग रेंज देईल, तसेच बॅटरी पूर्ण चार्जिंग होण्यासाठी फक्त 4 ते 5 तास लागतील, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच रीजनरेटिंग ब्रेकिंग टेक्नॉलॉजीच्या वापरासह युझरला 4 दिवसांत स्कूटरला एकदाच चार्ज करावे लागणार आहे. कंपनी या नवीन बॅटरीसह 3 वर्षाची वॉरंटी म्हणजे त्यात दोन वर्षांचे कव्हरेज आणि एक वर्ष विनामूल्य सर्व्हिसिंगदेखील दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी ही बॅटरी XGT-KM, X-One आणि XGT-X4 या मॉडेल्सच्या स्कूटरमध्ये वापरणार आहे. या स्कूटर कंपनी डिलरशीपवर पुढील महिन्यापासून उपलब्ध होणार आहेत. सध्या आणखी एका नव्या बॅटरी तंत्रज्ञानावर काम सुरू असून त्याचा वापर X4 मध्ये केला जाणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच ती 350 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंजही देण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे.