लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देवदिवाळीनिमित्त 1 हजार 111 सप्तरंगी फिरत्या दिव्यांची आरास

पुणे : गोलाकार फिरणा-या तेलाच्या दिव्यांनी उजळलेला लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर… सभामंडपापासून ते कळसापर्यंत दिव्यांची रोषणाई आणि फुले व रंगावलीची आकर्षक आरास अशा पारंपरिक पद्धतीने देवदिवाळीनिमित्त करण्यात आलेल्या दीपोत्सवाने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. संपूर्ण मंदिर परिसरात १ हजार १११ सप्तरंगी दिव्यांनी नयनरम्य रोषणाई करण्यात आली होती.

बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देवदिवाळीनिमित्त तेलाच्या १ हजार १११ सप्तरंगी फिरत्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली. यावेळी पुण्याचे सहधर्मादाय आयुक्त सुधीर बुक्के, उपायुक्त नवनाथ जगताप, सहाय्यक धर्मादाय आयुक्त अमरदीप तिडके, राहुल चव्हाण, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, विश्वस्त चंद्रशेखर हलवाई यांसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्री दत्त दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.