कोरेगाव भीमात वाईनशॉप मालकाच्या नव्याकारची मोठी पूजा; शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार मालकासह 15 जणांवर FIR दाखल

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर तालुक्याच्या कोरेगाव भीमा येथे एका वाईनशॉप मालकाने नवीन फॉरच्युनर कार घेऊन सदर कारची मोठ्या धुमधडाक्यात पूजा केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कार मालक कृष्णा रोहिदास ढेरंगे यांच्यासह राम रोहिदास ढेरंगे, प्रदीप कैलास ढेरंगे, दिपक संजय लटके, मच्छिंद्र पर्वतराव ढगे यांसह आदी दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील वाईनशॉप मालक कृष्णा रोहिदास ढेरंगे यांनी नुकतीच नवीन फॉरच्युनर कार घेतली, सध्या लॉकडाऊन तसेच गर्दी करण्यास बंदी असताना देखील त्यांनी सदर कारचे धुमधडाक्यात गर्दी करून कारचे पूजन केले, तर यावेळी अनेकांनी तोंडावर मास्क लावलेले नव्हते तर गर्दी देखील केलेली होती. कारची पूजा झाल्यानंतर सदर पूजेचे फोटो सोशल मिडीयावर प्रसारित झाले त्यांनतर कोरेगाव भीमा तलाठी जयमंगल देविदास धुरंदर रा. विठ्ठलनगर शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी कृष्णा रोहिदास ढेरंगे, राम रोहिदास ढेरंगे, प्रदीप कैलास ढेरंगे, दिपक संजय लटके सर्व रा. ढेरंगेवस्ती कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे, मच्छिंद्र पर्वतराव ढगे रा. आपटी ता. शिरुर जि. पुणे यांच्या सह अनोळखी दहा जणांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.