Pune News : पुण्यात यंदा फळांच्या राजाचे उशिरा आगमन होणार, वातावरणातील बदलाचा परिणाम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अवेळी आणि दिर्घकाळ झालेला पाऊस, मोहोर येण्याची उशिराने सुरु झालेली प्रक्रिया, तसेच उशिराने सुरु झालेली थंडी या वातावरणातील बदलामुळे यंदा आंबा हंगामावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेत पळांच्या राज्याचे म्हणजेच आंब्याचे आगमन जवळपास एक महिना उशिरा सुरु होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. मार्चमध्ये आंब्याची आवक अतिशय अल्प राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. एकंदरीतच आंबा उपलब्धतेचा कालावधी यंदा कमी असणार आहे. त्यामुळे राज्याच्या पणन मंडळाकडून आंब्याच्या निर्यातवाढीसाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती मंडळाचे व्यवस्थापक सतीश वराडे यांनी दिली.

विकसित देशांना आंबा निर्यातीसाठी क्रमप्राप्त असलेली मँगोनेट नोंदणी कृषी विभागामार्फत केली जाते. यंदा साडेबारा हजार आंबा उत्पादक शेतकऱ्यांची मँगोनेट अंतर्गत नोंदणी झाली आहे. यात हापूस आंब्याचे नोंदणी झालेले शेतकरी सुमारे 9 हजार असून अजूनही शेतकऱ्यांची नोंदणी सुरु आहे. आंब्याला भौगोलिक संकेतांक नोंदणी अर्थात जीआय प्राप्त झाली असून कोकणातील आंबा हापूस या नावाने विक्री करता यावा व इतर भागातील उत्पादित आंब्याची भेसळ होवू नये, यासाठी भौगोलिक संकेतांक नोंदणीसाठी आंबा उत्पादक, विक्रेते, निर्यातदार व खरेदीदार यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने कृषी पणन मंडळामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे.

मँगोनेटमध्ये नोंदणी, निर्यातवृध्दीसाठी योजना, देशांतर्गत विक्री व्यवस्थेच्या नियोजनामुळे यंदा आंबा उत्पादनावर परिणाम झाला असला तरी उत्पादकांना चांगला दर प्राप्त होऊन ग्राहकांना उत्तम प्रतीचा आंबा उपलब्ध होण्यासाठी मदत होईल, असे कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले.