Maharashtra Politics | मुख्यमंत्री नक्की दावोसमध्ये किती तास थांबले?; यावर उदय सामंत आणि दीपक केसरकर यांची भिन्न मते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | जागतिक आर्थिक परिषद नुकतीच स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये पार पडली. त्यावेळी या आर्थिक परिषदेतून राज्यात सुमारे १ लाख ४० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे दावोस येथे गेले होते. मात्र, १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईला येणार असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दावोस दौरा अर्धवट सोडून यावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यातील उपस्थितीवरून शिंदे गटाच्या दोन नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले गेल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. (Maharashtra Politics)

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी आज (दि.२५) आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ७६ तास दावोसमध्ये होते आणि ते केवळ चार तास झोपत होते, असा दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दावोस दौऱ्यासाठी ३५ ते ४० कोटी रूपये खर्च झाल्याचा आरोप विद्यमान सरकारवर केला होता. त्यावर सविस्तर स्पष्टीकरण देण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

मात्र, दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री हे २८ तास दावोसमध्ये होते. असे म्हटले होते. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नक्की किती तास दावोसमध्ये होते? यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. उदय सामंत म्हणाले होते की, ‘दावोसमध्ये दोन किलोमीटर परिसरात जागतिक आर्थिक परिषदेचे शिबीर भरले होते. महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनमध्ये अनेक देशांचे प्रमुख, भारतातील इतर मुख्यमंत्री आणि उद्योजक भेट देत होते. मुख्यमंत्र्यांचे डाव्होसमधील वास्तव्य हे फक्त २८ तासांचे होते. पण या २८ तासांत ते महाराष्ट्रात ज्या गतीने काम करतात, त्याच्या दुप्पट गतीने डाव्होसमध्ये काम करत होते.’ असे वक्तव्य केले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १६ जानेवारी रोजी दावोसला जाण्यासाठी रवाना झाले होते. नंतर १८ जानेवारीला
दुपारी दावोसवरून ते महाराष्ट्रात परतले होते. याबाबतचे ट्वीट सीएमओ महाराष्ट्र या ट्वीटर अकाऊंटवर आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री नक्की किती वेळ दावोसमध्ये होते यावर दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्या
वक्तव्यात भिन्नता दिसत आहे.

दरम्यान, दोन्ही मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत वेगवेगळा दावा केला असला तरी सरकारच्या
म्हणण्यानुसार हा दौरा यशस्वी झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत १ लाख ४० हजार कोटींची गुंतवणूक झाली नव्हती.
ती या दौऱ्यामुळे आली आहे. आता हे करार प्रत्यक्षात कधी उतरणार याची उत्सुकता विरोधकांना लागली आहे.
तर या दौऱ्यावर टीका करताना विरोधक म्हणाले होते की, ज्या कंपन्या महाराष्ट्रात आधीपासून आहेत.
त्यांच्याबरोबर देखील यावेळी करार करण्यात आले आहेत. असा आरोप विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

Web Title :- Maharashtra Politics | how many hours did chief minister eknath shinde stay at davos uday samant and dipak kesarkar different claims