‘कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करा’, मंत्र्यांनी दिला इशारा (व्हिडीओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून लवकरच तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर शासन-प्रशासन सतर्क झालं आहे. दुसऱ्या लाटेत ज्या अडचणी आल्या त्या अडचणी तिसऱ्या लाटेत येऊ नयेत यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या आणि उपाययोजना करण्याच्या सूचना नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिल्या आहेत. तिसरी लाट दारावर असून मास्टर प्लॅन तयार करा अशा सूचना नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

नितीन राऊत यांनी शनिवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहीती घेऊन महत्त्वाच्या सूचना दिल्या. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये ओसरलेली लाट पुन्हा उग्र झाली आहे. तज्ज्ञांच्या मते नागपूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता निश्चित आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी ‘मी जबाबदार’ म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी. नागपूर शहर व ग्रामीण भागात कमीत कमी नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी व मृत्यूचा आकडा नियंत्रणात रहावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने तिसरी लाट रोखण्यासाठी मास्टर प्लान तयार करावा. त्यामध्ये महत्त्वाचे निर्णय कालमर्यादेत पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या.

तिसरी लाट अतिशय गंभीर
मागली वर्षभरात सतराशे बेडवरुन नऊ हजार बेड आम्ही निर्माण केले. मोठ्या प्रमाणात कोविड सेंटर सुरु केले. ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा होण्यासाठी रेल्वेपासून हवाई दलापर्यंत मदत घेतली. मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहे. तसेच मनुष्यबळ देखील वाढवण्यात आले आहे. मागील लाटेत नागूपर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक दललक्ष रुग्णसंख्येमागे साधारण बेड, आयसीयू बेडसह व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना मागे टाकले आहे. परंतु तरी देखील शास्त्रज्ञांच्या मते तिसरी लाट ही अधिक गंभीर असणार आहे. यामध्ये यंत्रणा अपुरी पडू शकते. त्यामुळे युद्ध पातळीवर तुम्ही कामाला लागा. तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी सज्ज व्हा, असा इशारा नितीन राऊत यांनी उच्चस्तरीय बैठकीत दिला.

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा संदर्भात माहिती रवींद्र ठाकरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली. जिल्ह्यामध्ये ज्या गावांत कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे व ज्या गावांमध्ये कोरोनाचा उद्रेक अधिक झाला आहे. याची यादी तयार करण्यात आली असून स्थानिक नागरिकांसोबत चर्चा करण्यासाठी तहसीलदार व संबंधित यंत्रणांना त्या गावात जाण्यास सांगितले आहे. तसेच लसीकरण आणि संक्रमित रुग्णावरील उपचार यासाठी मोहिम राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

पालकमंत्र्यांच्या सूचना
– प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनसाठी आग्रही राहावे लागले, सुपरस्प्रेडसुद्धा तपासले जातील याची काळजी महापालिकेने घ्यावी. पालिकेने दररोज दहा हजार चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करावे.

– प्रत्येक तालुक्यातील कोविड सेंटर सक्षम करावे. मेयो एम्स व शहरातील इतर खसगी रुग्णालयावरील ताण कमी करण्याकडे लक्ष द्यावे.

– पालकमंत्र्यांकडून इंदोरा भागातील आंबेडकर हॉस्पिटल, ईएसआयसी हॉस्पिटल, हज हाऊसचे श्रेणी वर्धन करण्यासाठी ग्रामीण मधील कोराडी, कामाठी, रामटेक, मौदा, उमरेड, काटोला रुग्णालयातील उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

– तिसऱ्या लाटेत लहान मुले लक्ष्य ठरणार असल्याने त्यांना वाचवण्यासाठी टास्क फोर्स तयार करा, असे निर्देश नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिले.