Mansukh Hiren Case : ATS कडून पोलिस निरीक्षक (PI) सुनील माने यांची चौकशी सुरु, महत्वाचे धागेदोरे हाती

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. तर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र एटीएस करत आहे. हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसने आजपर्यंत अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. यातच आता चौकशीसाठी कांदिवली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांना बोलावले असून एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

अंबानीच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी महत्वाची माहिती एटीएसच्या हाती लागली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा ताबा घेण्यासाठी एटीएस कोर्टात प्रयत्न करणार आहे. तसेच मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून तावडे नावाच्या पोलिसांने फोन करून चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर ते गेले ते घरी परत आलेच नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे कांदिवली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांची चौकशी केली जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.