… तर अंबानी स्फोटकं, मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा कधीच उलगडा झाला असता; ATS चे परमबीर सिंगांकडे बोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसुख हिरेन हत्याप्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांच्या घरातून NIA ने एक डायरी ताब्यात घेतली आहे. डायरीवरून NIA हत्याप्रकरणाचे कोडे सोडविल्याचा दावा करत आहे. तर दुसरीकडे ATS सुत्रांनुसार, मुंबई पोलिसांनी वेळेवर सहकार्य केले असते. तर मनसुख हत्या प्रकरण खूप अगोदरच सोडविता आले असते. ATS ने पोलीस आयुक्तालयाकडे त्यांना सीसीटीव्ही फुटेजचा अ‍ॅक्सेस मागितला होता. परंतू तो वेळेत दिला गेला नाही. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंगांना ATS ने चार पत्रे लिहिली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याने हे प्रकरण सोडविण्याऐवजी उलट अडचणी वाढत गेल्याचे एटीएसने म्हटले आहे.

ATS च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले की, अंबानीच्या घराजवळ स्फोटक आढळल्याच्या दिवशी म्हणजेच 25 फेब्रुवारीच्या 45 दिवस आधी आणि स्फोटक सापडल्याच्या नंतरच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करायची होती. मिळालेल्या माहितीनुसार ज्या स्कॉर्पिओमध्ये स्फोटक ठेवली होती. ती कार 19 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी असे 3 दिवस पोलीस मुख्यालयात आणण्यात आली होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज दिल्यास हे उघड झाले असते.

NIA सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक शिंदे यांच्या घरातून एक डायरी मिळाली आहे. यात वाझेच्या वसुलीची माहिती नोंद आहे. यामध्ये जवळपास 30 पब आणि बियर बारची नावे आणि पत्ते लिहले आहेत. त्यांच्याकडून वसुली करण्याची जबाबदारी वाझेनी शिंदेला दिली होती. याशिवाय काही पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि व्यावसायिकांची नावे देखील पत्त्यासह या डायरीत आहेत. मुंबई पोलिसांशी संबंधित एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार दर महिन्याला 2 लाख रुपये वसूल करून वाझेकडे द्यावेच लागत होते. पोलीस जेव्हा कधी बिअर बार आणि बेकायदा अड्ड्यांवर छापा टाकायची तेव्हा त्यांना वाझेचा फोन यायचा. यामध्ये तो अटक केलेल्या व्यक्तींना सोडण्यास सांगत असल्याचे म्हटले आहे.