रेल्वेत नोकरी लावण्याच्या अमिषाने गंडा घालणाऱ्या टोळीचा भांडाफोड, IRCTC च्या कर्मचाऱ्याला अटक

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाईन – रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणा-या टोळीचा अंबरनाथ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी आयआरसीटीसीच्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या प्रकरणात रेल्वेचे दोन अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

कैलास राजपाल सिंह असे अटक केलेल्या भामट्या कर्मचा-याचे नाव आहे. याप्रकरणी कुमार चव्हाण (रा. बदलापूर) यांनी अंबरनाथ पोलिसात फिर्याद दिली आहे. अंबरनाथ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुमार चव्हाण हा नोकरीच्या शोधात होता. त्यावेळी आरोपी कैलासने रेल्वेत आपली अधिका-याशी ओळख असून तुला नोकरी लावतो असे अमिष दाखवले. कैलास आयआरसीटीसीच्या चर्चगेट स्टेशनवरील कँटीनमध्ये काम करत होता. खोटी परीक्षा आणि मुलाखत घेऊन पास होण्यासाठी 5 लाख रुपये त्याने कुमारकडून घेतले. तसेच त्याने कुमारला खोट नियुक्तीपत्रही दिल. मात्र हा सगळा प्रकार खोटा असून आपली फसवणूक झाल्याच लक्षात येताच कुमारने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कैलास दर एक ते दोन महिन्यांनी राहण्याचे ठिकाण बदलत होता. अखेरीस विरार येथून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात रेल्वेचे दोन अधिकारीसुद्धा सहभागी असल्याची माहिती समोर आली. कैलास हा अधिका-यांना नवीन गि-हाईक शोधून देत असत. त्यानंतर हे अधिकारी बनावट लेटरहेड, शिक्के वापरून फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. पोलीस आता या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहेत. अशाच पद्धतीने या त्रिकुटाने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता असून पोलीस त्या दृष्टीने तपास सुरु करत आहेत.