Pune News : वनाज-गरवारे विद्यालय मार्गावरील मेट्रो ऑगस्टमध्ये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. मेट्रोकडून टप्पेनिहाय चाचण्या घेण्यात येत आहे. त्यानुसार वनाज ते रामवाडी या मार्गिकेदरम्यान वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावरील मेट्रोची चाचणी मार्चमध्ये घेण्यात येणार आहे. तर या मार्गावर ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष मेट्रो सुरु होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यानी केला आहे.

शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी महापालिकेत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शहरातील मेट्रो कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृह नेते गणेश बीडकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मेट्रोबाबत अतिशय समाधानकारक चित्र आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना येत्या वर्षभरात मेट्रोतून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही शहरातील मेट्रो प्रकल्पांचे काम टप्पे निहाय सुरु असून त्यादृष्टीने पाच टप्प्यात मेट्रोची वर्षभरात सेवा सुरु होईल. वनाज ते गरवारे महाविद्यालय दरम्यानच्या मेट्रो सेवेला ऑगस्ट महिन्यात प्रारंभ होईल असा विश्वास मेट्रोच्या अधिकाऱ्यांना असल्याचे पाटील यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांकडून मेट्रोच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. लॉकडाऊननंतर मेट्रोच्या कामाला गती आली असली तरी आणखी वेगाने आणि वेळेत काम कसे पूर्ण होईल यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.