बंगालमध्ये 61 भाजप आमदारांना मिळाली X कॅटेगरीची सुरक्षा, गृह मंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बंगालमध्ये टीएमसीच्या विजयानंतर राज्यात हिंसेच्या घटना घडल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने 61 आमदारांना एक्स कॅटेगरीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. बंगालच्या 61 भाजपा आमदारांना सीआयएसएफची सुरक्षा देण्याबाबत आढाव्यानंतर निर्णय घेतला गेला आहे. यापूर्वी 70 आणि लोकांना सुरक्षा देण्यात आली होती जी 15 मेपर्यंत वैध आहे. भाजपाच्या या 70 नेत्यांच्या सुरक्षेत सुद्धा सीआयएसएफला तैनात करण्यात आला आहे.

बंगालमध्ये राजकीय हिंसेच्या घटना घडल्या होत्या. निवडणुकीदरम्यान सुद्धा टीएमसी आणि भाजपाच्या नेत्यांवर हल्ल्याच्या घटना समोर आल्या होत्या. निवडणूक संपल्यानंतर बंगालमध्ये भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी टीएमसी वर्कर्सवर हल्ल्याचा आरोप सुद्धा लावले आहेत. बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या विरोधात भाजपाने आंदोलन सुद्धा केले होते. भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा विरोध दर्शवण्यासाठी बंगालला गेले होते.

तर, यापूर्वी भाजपा नेते प्रवेश सिंह वर्मा यांनी इशारा देताना म्हटले होते की, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी लक्षात ठेवावे, मुख्यमंत्री आणि तेथील आमदारांना सुद्धा दिल्लीला यायचे आहे. यास इशारा समजावा. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांच्या मुलाने म्हटले की, निवडणुकीत जय-पराजय होत असतो, परंतु हत्या नाही. त्यांनी म्हटले की, टीएमसीचे गुंड बंगालमध्ये विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांना निशाणा बनवत आहेत.

नुकतेच बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला विजय मिळाला आहे. बंगालच्या सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या हातात आली आहेत. पाच मे रोजी ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. टीएमसीने या निवडणुकीत 213 जागा जिंकल्या आहेत. तिकडे बंगालच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा भाजपा 3 जागांवरून वाढून 77 जागांवर पोहचली आहे आणि मुख्य विरोधीपक्ष बनली आहे.