म्हाडा अधिकाऱ्याच्या 7 नातेवाईकांना घराची लॉटरी, चौकशी करण्याची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  कल्याणच्या ग्रामीण भागातील खोणी येथे म्हाडाकडून गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामधील गोल्डन ड्रीम प्रोजेक्टमधील आर्चिड इमारतीमधील सात सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये म्हाडातील अधिकाऱ्याच्याच सात नातेवाईकांना खोल्या देण्यात आल्याने आमदार प्रमोद पाटील यांनी यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्याकडे केली आहे.

याअगोदर सुद्धा शासनाच्या विविध योजनांमधून उभारलेल्या गृहप्रकल्पांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून अधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींना किंवा नातेवाईकांनाच या गृहसंकुलांचा लाभ देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा म्हाडाच्या घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात करण्यात येत आहे. म्हाडाच्या अधिकारी असलेल्या छाया राठोड यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेतल्याच्या आरोपसुद्धा करण्यात येत आहे.

काय आहे नेमका प्रकार

म्हाडाच्या खोणी येथील गोल्डन ड्रीम प्रोजेक्टमधील आर्चिड इमारतीमधील सदनिका छाया राठोड यांच्या बहिणीचा नवरा कुलदीप चव्हाण, चुलतभाऊ दया राठोड, बहिणीच्या नवऱ्याची बहीण वर्षा आडे, सावत्रभाऊ वसंत राठोड, सख्खा भाऊ महेश राठोड, वडील वामनराव राठोड, नातेवाईक मोरेश्वर जाधव यांना लिलावाद्वारे देण्यात आल्या आहेत. एकाच दिवशी काढण्यात आलेल्या सोडतीत एकाच अधिकाऱ्याच्या सात नातेवाईकांना सदनिका मिळाल्याने या सोडतीत घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा प्रकारे आणखी काही अधिकाऱ्यांनीदेखील पदाचा गैरवापर करून आपल्या नातेवाईकांचा याचा फायदा करून दिला आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, तसेच केलेल्या कारवाईची माहिती द्यावी, अशी मागणी प्रमोद पाटील मिलिंद म्हैसकर यांच्याकडे करण्यात आली आहे.