आमच्याकडे अणुबॉम्ब नाहीये असं वाटतं का ?; ओवेसींचा पाकिस्तानवर पुन्हा हल्लाबोल

हैदराबाद : वृत्तसंस्था- शांततेच्या गप्पा करणाऱ्या पाकिस्तानला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी खडे बोल सुनावले आहे. हैदराबादमधील एका जनसभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. तुम्ही अणुबॉम्ब बद्दल बोलता. आमच्याकडे अणुबॉम्ब नाहीये असं वाटतं का? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

पाकिस्तानच्या संसदेमध्ये बसून तुम्ही टिपू सुलतान, बहादुर शाह जफर यांच्याबद्दल बोलता. टिपू सुलतान हे हिंदुंचे शत्रू नव्हते. त्यांच्या साम्राज्याच्या विरोधात जे होते मग ते कुठल्याही धर्माचे असोत ते त्यांचे शत्रू होते. कधीतरी हे सुद्धा वाचा, असा टोला त्यांनी इम्रान खान यांना लगावला. तुम्ही आधी जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोयबाचा खात्मा करा, असंही त्यांनी म्हटलं.

तसंच यावेळी त्यांनी सरकारवरही टीका केली. माझ्या मुस्लिम असण्यावरून हा देशाप्रति प्रामाणिक आहे की नाही, असा तुम्हाला माझ्यावर संशय असेल. परंतु भाजप असे म्हणत असेल की, मेरा बुथ सबसे मजबुत, तर मी म्हणतो मेरी सरहद मजबुत तो मेरा देश मजबुत, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, मागच्या आठवडयात मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या सबेतही त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.