देशातील गुणवत्ताधारक परराष्ट्रांच्या सेवेत !

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या 20 वर्षांतील केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील उच्च गुणवत्ताधारक (टॉपर्स) सध्या कुठे आहेत, असा प्रश्न कुणाला पडला असेल तर त्याचे उत्तर, त्यापैकी निम्म्याहून अधिक परदेशात विविध महत्त्वाच्या पदांवर आहेत, असेच मिळते. सीबीएसई’ आणि ‘सीआयएससीई’ या केंद्रीय शिक्षण मंडळांनी 1996 ते 2015 या काळात घेतलेल्या 10 वी, 12 वीच्या परीक्षांत देशात प्रथम आलेल्या 86 विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केले. त्यातील हे निष्कर्ष आहेत.

1996 ते 2015 या वीस वर्षाच्या कालावधीतील इयत्ता 10 वी आणि 12 परीक्षेतील अर्ध्यापेक्षा जास्त गुणवत्ताधारक विद्यार्थी परदेशात वास्तव्यास आहेत. यात कोणी न्यू यॉर्कमध्ये कर्करोगतज्ज्ञ आहे, कोणी जगप्रख्यात मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) पीएचडी फेलो आहे, कोणी हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहे, तर कोणी सिंगापूरमध्ये निधी व्यवस्थापक आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक 11गुणवत्ताधारक ‘गुगल’मध्ये कार्यरत आहेत.

निम्म्याहून अधिक गुणवत्ताधारकांनी अमेरिका हे ठिकाण निवडले आहे. त्यापैकी बहुतेकजण आयआयटीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान पदवीधारक आहेत. त्यांच्यापैकी निम्मे गुणवत्ताधारक हे महानगरांबाहेर वाढलेले आहेत. त्यापैकी एक अल्पसंख्यांक समाजातील आहे, परंतु त्यांत दलित आणि आदिवासींमधील एकाचाही समावेश नाही. विशेष म्हणजे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थीनींना परदेशात जाण्याची संधी कमी मिळते. प्रत्येक गुणवत्ताधारक ही बुद्धिमत्ता आणि प्रयत्नांची, उत्कृष्ठता आणि यश यांची एक कथा आहे. भारताने 1990 नंतर खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर घडलेल्या पिढय़ांच्या त्या प्रातिनिधिक कथा असल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

अमेरिकेला सर्वाधिक प्राधान्य
21 ते 42 या वयोगटातील निम्म्याहून अधिक गुणवत्ताधारक परदेशात आहेत. त्यापैकी बहुतेक सर्व नोकरी करतात, तर काहीजण उच्च शिक्षण घेत आहेत. तर प्रत्येक चार जणांपैकी तीन जण अमेरिकेत आहेत. अन्य काही ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, चीन, कॅनडा, बांग्लादेश आणि युएईमध्ये वासतव्यास आहेत.