शिवरायांच्या जयंतीनिमित्त रायगडावर डिस्को रोषणाई; छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन –  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले रायगडावर डिस्को रोषणाई करण्यात आल्याने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत पुरातत्व खात्याला फटकारलं आहे. एवढेच नाही, तर संभाजी राजे यांनी फेसबुकवरीह पोस्ट लिहित यासंदर्भात निषेध व्यक्त केला आहे.

काय म्हणाले संभाजीराजे ?

भारतीय पुरातत्व विभागाने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरुपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो, अशी आक्रमक भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून विद्युत रोषणाई

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी किल्ले रायगडाला भेट दिली होती. यावेळी रायगडावरील महत्त्वपूर्ण वास्तू, छत्रपती शिवरायांची मूर्ती अंधारात असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी तातडीने पुरातत्व विभागाचे अधीक्षक राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधून रायगडावर विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्याची मागणी केली. तसेच आवश्यक फंड देण्याची तयारी दर्शवली. शिंदे यांच्या मागणीनंतर पुरातत्व विभागाने रायगडावर विद्युत रोषणाई केली.