MPSC उमेद्वारांना आधार लिंक करण्यासाठी अल्टिमेटम

राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससीची) परीक्षा देणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी आपल्या प्रोफाईलमध्ये आधार क्रमांक नमूद केला नसेल, प्रोफाईल आधार क्रमांकाशी जोडली नसेल, त्यांनी तातडीने आधार क्रमांक प्रोफाइलशी लिंक करावा त्यासाठी 31 मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जे उमेदवार आधार लिंक करणार नाहीत त्यांची प्रोफाईल 1 जून 2018 पासून निष्क्रिय (Deactivate) करण्यात येणार आहे.

MPSC परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी, आयोगाने मार्च 2017 पासून आधार कार्ड तपशील लागू केला होता. आता या निर्णयाला वर्ष झाले आहे. मात्र ज्यांचे जुने प्रोफाईल आहेत त्यांनी अजूनही आधार कार्डचे तपशील अपडेट केले नाहीत. त्यामुळे आता आयोगाने थेट असे प्रोफाईल निष्क्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे.