पृथ्वीला प्रदुषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी वृक्षारोपण करा : महापौर मुक्ता टिळक         

पृथ्वीतलावर माणसांनी केलेल्या आक्रमणाचा तोटा सध्या सगळीकडे दिसत आहे. त्यामुळे पृथ्वीला प्रदुषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अधिकाधिक वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. पुणे शहरात अनेक उद्याने असून सकाळी ही उद्याने नागरिकांनी भरलेली असतात. याचे एकमेव कारण चांगली, मोकळी, स्वच्छ हवा मिळविण्यासाठी नागरिकांना येथे यावे लागत आहे. प्रत्यक्षात सर्वच ठिकाणी नैसर्गिकरित्या प्राणवायुचा पुरवठा होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच अधिकाधिक वृक्षारोपण सर्वांनी एकत्रिपतणे करा, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आधार फाऊंडेशन आणि माजी नगरसेवक दिलीप काळोखे यांनी वृक्षांचा वाढदिवस व वृक्षसंवर्धनाची शपथ या कार्यक्रमाचे आयोजन सदाशिव पेठेतील महाराणा प्रताप उद्यान येथे केले होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे, अ‍ॅड. वंदना चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर प्रशांत जगताप, कमल व्यवहारे, अविनाश बागवे, नीता परदेशी, नरेंद्र व्यवहारे, प्रा. भा. ल. ठाणगे, दादा गुजर, प्रसेनजीत फडणवीस आणि विविध गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वृक्षांना फुगे लावून त्यांच्याभोवती रांगोळी काढून ते सजविण्यात आले होते. तसेच वृक्षांचे पूजन करण्यात आले. नवीन वृक्ष लावण्यासाठी आदर्श विद्यालय आणि राष्ट्रीय कला अकादमीतील विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले. केक  कापून वृक्षांचा प्रतिकात्मक वाढदिवस साजरा करण्यात आला आणि वृक्षसंवर्धनाची शपथ घेण्यात आली.

दिलीप काळोखे यांनी पाच वर्षांपूर्वी शहराच्या शुक्रवार पेठ, सदाशिव पेठ या भागांमध्ये लावलेली झाडे वाढताना दिसत आहेत. मुक्ता टिळक म्हणाल्या, ”राज्यसरकारने घेतलेला अत्यंत महत्वाचा निर्णय प्लास्टिकबंदीचा आहे. त्या प्लास्टिकबंदीला आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. ही प्लास्टिकबंदी जेवढी होईल, तेवढे आपण निसर्गाचे रक्षण करू शकणार आहोत.  प्रत्येक व्यक्तीकडून छोटासा प्रयत्न झाला तर या वसुंधरेचे, पर्यावरणाचे रक्षण करू शकू. वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम होतात, परंतु पूर्वी लावलेले वृक्ष चांगले जगले आहेत की नाही. हे पाहण्याची जबाबदारी देखील प्रत्येकाची असते. त्यामुळे हा स्तुत्य उपक्रम आहे.”

अनिल शिरोळे म्हणाले,”आपले पुणे पूर्वीसारखे राहिलेले नाही. त्यामुळे एखादा प्रश्न निर्माण झाला तर उपाय आपण समोर ठेवावा लागतो. मोदीजी नेहमी सांगतात मी एकटा काही करु शकणार नाही १२५ कोटी लोक यामध्ये सहभागी झाले. तर भारताचे प्रश्न सुटू शकतील. आपण सगळे मिळून पर्यावरण वाचविण्याचा प्रयत्न करुया”.

मोहन जोशी म्हणाले,”अनेक संस्थांचे वर्धापनदिन होतात अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु झाडांचा वाढदिवस या एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सध्या पुणे शहराची परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. तापमान वाढताना दिसत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावणे ही सर्व पुणेकर नागरिकांची जबाबदारी आहे.”

दिलीप काळोखे म्हणाले,”पुणे शहरातील हरितक्षेत्र कमी होत चालले आहे. हे हरितक्षेत्र वाढविण्याची गरज आहे. यासाठी हा उपक्रम म्हणजे खारीचा वाटा आहे. पुढील काळात शहराच्या विविध भागात नागरिक आणि गणेश मंडळांच्या सहकार्याने एक हजार झाडांचे पालकत्व घेण्यात येणार आहे. विकास होत असताना निसर्गाचा -हास होता कामा नये. पुढच्या पिढीसाठी ही निसर्गसंपदा आपण जगवली पाहिजे,”असेही त्यांनी सांगितले.