मम्मी आशा गवळीला तात्पुरता अटकपूर्व जामिन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पाच लाख रूपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे जिल्हयातील मंचर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात कुख्यात अरूण गवळी यांची पत्नी आशा उर्फ मम्मी अरूण गवळी यांना खेड न्यायालयाचे अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश एन.के. ब्रम्हे यांनी काही अटींवर तात्पुरता अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे.
याप्रकरणी चंदनगनर परिसरातील एका व्यापार्‍याने पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आशा उर्फ मम्मी गवळी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला होता. आशा गवळी यांच्यासह सुरज यादव (लोणी धामणी, ता. आंबेगाव), मोमीन मुजावर (रा. मुंबई) आणि बाळा पठारे (रा. वाघोली) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी यादव, मुजावर आणि पठारे यांना अटक केली आहे. ही घटना दि. 13 ते 16 एप्रिल दरम्यान घडली आहे. तक्रारदार व्यापार्‍याचे चंदननगर परिसरात ड्रायफ्रुटचे दुकान आणि लोणी धामणी येथे एक दुकान आहे. तक्रारदार व्यापार्‍याच्या भावाचे देखील एक दुकान आहे. हे तिन्ही दुकान व्यवस्थितरित्या चालु ठेवु देण्यासाठी 5 लाख रूपयाच्या खंडणीची मागणी मोबाईलवरून करण्यात आली होती. खंडणीची रक्‍कम न दिल्यास दुकानाची मोडतोड करून जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदार व्यापार्‍याने पोलिसांकडे धाव घेतली आणि पोलिसांनी आशा गवळी यांच्यासह इतरांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला.
खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आशा उर्फ मम्मी गवळी यांनी अ‍ॅड. पी.बी. बिराजदार, अ‍ॅड. नितीन शिंदे, अ‍ॅड. सुरेश जाधव आणि अ‍ॅड. डी.एल. वाठोरे यांच्यामार्फत अटकपुर्व जामिनासाठी खेड न्यायालयात अर्ज केला. बचाव पक्षाने युक्‍तीवाद केल्यानंतर न्यायालयाने पोलिस बोलावतील त्यावेळी पोलिस ठाण्यात हजेरी लावणे, तपासात सहकार्य करायचे, तपासामध्ये कुठलीही ढवळाढवळ करायची नाही, फिर्यादी व्यापार्‍यावर दबाव टाकायचा नाही, सध्याचा पत्‍ता आणि मोबाईल क्रमांक तपास अधिकार्‍यांना द्यायचा, न्यायालयाच्या परवानगी शिवाय महाराष्ट्र सोडायचा नाही, जामिनावर असताना पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करायचा नाही या अटींवर आशा उर्फ मम्मी गवळी यांना खंडणीच्या दोन्ही गुन्हयात प्रत्येकी 30 हजार रूपयाचा जामिन मंजूर केला. आशा उर्फ मम्मी गवळी यांच्यासह इतर 10 जणांवर सरपंच सावळा नाईक यांच्याकडून दीड लाख रूपयाची खंडणी घेतल्याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात देखील आशा उर्फ मम्मीला अटकपूर्व जामिन मंजूर करण्यात आला.