Pimpri News : पाळीव प्राण्यांच्या दहनासाठी 1 हजार रुपये शुक्ल, स्थायी समितीचा निर्णय

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मांजर व कुत्रा या मृत पाळीव प्राण्यांच्या दहनासाठी पिंपरी चिंचवड महापालिका एक हजार रुपये शुक्ल आकारणार आहे. त्यास स्थायी समितीने बुधवारी (दि.23) झालेल्या सभेत मंजूरी दिली आहे. याशिवाय विविध विकासकामांसाठी 68 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिका हद्दीतील कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी मृत झाल्यास त्यांचे दफन करण्यासाठी नेहरुनगर येथे 2007 पासून दफनभूमी सुरु करण्यात आली आहे. याच ठिकाणी दोन वर्षापासून मृत प्राणी दहन यंत्र सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी दरमहा सरासरी 20 हजार रुपये खर्च येतो. मात्र, देखभाल-दुरुस्ती, इंधन व कर्मचाऱ्यांवरील खर्च वाढत असल्यामुळे शुल्क आकरणीचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. अंत्यविधीसाठी दोन हाजर रुपये शुल्क आकारण्याचा मूळ प्रस्ताव होता. उपसूचनेद्वारे ही रक्कम एक हजार रुपये करण्यात आली.

पवना पुलासाठी 25 लाख अनामत
पवना नदीवर पिंपरीगाव व पिंपळे सौदागर यांना जोडण्यासाठी नवीन समांतर पूल बांधण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पाटबंधारे विभागाला 25 लाख रुपये अनामत देण्यात येणार आहे. नदीपात्रातील राडारोडा उचलल्यानंतर ही रक्कम महापालिकेला परत मिळणार आहे, त्यासही मंजूरी देण्यात आली.

रावेत जलउपसा केंद्रासाठी 89 लाख मंजूर
निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि शहरातील विविध पाण्याच्या टाक्यांच्या येथे कार्यान्वित असलेल्या स्काडा प्रणालीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी 7 कोटी 12 लाख खर्च आहे. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रात दुरुस्तीसाठी 89 लाख खर्च आहे. त्यास सभेत मंजूरी देण्यात आली आहे. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील टप्पा क्रमांक 1 व 2 योजनेअंतर्गत पंपींग मशिनरी दुरुस्तीसाठी 28 लाख खर्च येणार आहे.