नांदेड जिल्हा बँकेवर अशोक चव्हाण यांचा ‘वरचष्मा’ ! भाजपच्या चारी मुंड्या चित तर ‘मविआ’चा पॅटर्न यशस्वी

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर मात केली आहे. या निवडणुकीत ‘मविआ’ चा पॅटर्न यशस्वी ठरला आहे. काँग्रेसला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ मिळाल्याने नांदेड जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकूण २१ पैकी १७ जागांवर विजय मिळविला आहे. त्यात काँग्रेसला १३, राष्ट्रवादीने ३ आणि शिवसेनेने १ जागा जिंकल्या आहेत.

ही निवडणुक अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रतिष्ठेची केली होती. मात्र, निवडणुकीत ‘मविआ’ चा पॅटर्न यशस्वी ठरला आहे. निवडणुकीत भाजपला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले.

जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादीची युती झाली होती. राष्ट्रवादीचा एका गटाने भाजपला साथ देत जिल्हा बँक ताब्यात घेतली होती. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या वर्चस्वाला धक्का बसला होता. मात्र, यंदा चव्हाण यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मोट बांधत महाविकास आघाडी केली व प्रताप पाटील चिखलीकर यांना शह दिला.